अमरावती - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी एकमेव आधार असलेल्या चहा दुकानाचे अतिक्रमण ग्रामपंचायतीने पूर्वसूचना नदेताच काढल्याने युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगळरूळ दस्तगिर येथे सोमवारी दुपारी या तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून जीव देण्याचा प्रयत्न केला.
शरद देवगिरीकर असे या युवकाचे नाव असून गावातील मुख्य चौकात त्याचे चहाचे दुकान होते. कोणतीही पूर्व सूचना न देताग्रामपंचायतीने या दुकानाचे अतिक्रमण काढल्याने शरदचा संसार उघड्यावर आला. यामुळे नाराज झालेल्या शरदने पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शरदची समजूत काढली. आश्वासनानंतर तो खाली उतरला. पाईपलाईन टाकल्यानंतर परत त्याच जागेवर त्याला चहाचे दुकान टाकण्याची परवानगी ग्रामपंचायतने आंदोलना नंतर दिली. पोलिसांनी त्याला अटक करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.