अमरावती - धारणी तालुक्यातील कुठंगा येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तब्बल पाच दिवस बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. शाळेतील माजी विद्यार्थ्याने मध्य प्रदेशमध्ये पळवून नेऊन हे कृत्य केले. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही तरुणीला देण्यात आली आहे.
हेही वाचा- दिल्ली हिंसाचार: ताहिर हुसेनच्या तीन सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक
धारणी प्रकल्प कार्यालय अंतर्गत कुटंगा येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीशी आरोपी राजकुमार बंसीलाल बेडेकर (वय 23) याची ओळख झाली. त्यानंतर आपण बाहेर काही खरेदी करायला जाऊ, असे सांगत राजकुमारने तरुणीला सुट्टी घ्यायला सांगून मध्य प्रदेशमध्ये नेले.
दरम्यान, याबाबत मुख्याध्यापक व अधिक्षकांनी तरुणीच्या पालकांना माहिती दिली. त्यामुळे धास्तावलेल्या पालकांनी तिचा शोध सुरू केला असता राजकुमार याने तिला फूस लावून पळवून नेल्याचे त्यांना समजले. याबाबत त्यांनी धारणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली.
पोलिसांनी याप्रकरणी शोधाशोध सुरू केली. राजकूमार याने मध्य प्रदेशमधील कल्याणपूर येथे तरुणीला नेले असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी कल्याणपूर गाठून राजकुमारला अटक केली.
दरम्यान, 5 ते 9 मार्चपर्यंत आपल्यावर जबरदस्ती बलात्कार करुन याप्रकरणी कोणाला सांगितले तर जिवे मारेन, अशी धमकी दिली असल्याने तरुणीने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी राजकुमार बेडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक एल.के. मेहंदळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय माया वैश्य या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.