अमरावती - देशात घडणाऱ्या घटना या धार्मिक आधारावर असल्याचे दिसत असल्या तरी त्यांचा उद्देश दलित, बहुजन आणि मुस्लिमांची आर्थिक नाकेबंदी करणे हाच आहे. सत्तेवरील लोक घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली करीत आहे. ज्ञान प्रक्रियेला गढूळ कायेण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप लेखक आणि विचारवंत उद्धव कांबळे यांनी केला.
मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह येथे नवव्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. संमेलनाच्या उद्घाटन सत्रानंतर 'आंबेडकर आणि मार्क्स: नवे आकलन, नव्या दिशा' या विषयावर लेखक उद्धव कांबळे यांचे विशेष व्याख्यान झाले. यावेळी डॉ. बी.आर. वाघमारे अध्यक्षस्थानी होते.
मार्क्सवादी आणि कम्युनिस्ट पक्षांनी इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत दलितांच्या हिताची नेहमीच बाजू घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक आंदोलनात, मोर्चात डाव्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. कम्युनिस्टांवरील खटले बाबासाहेबांनी लढले, असा इतिहास असतानाही दलित जनता आणि मार्क्सवादी यांच्यात असलेली तेढ मात्र अनाकलनीय आहे, असे उत्तम कांबळे म्हणाले.