अमरावती : पेरणीनंतर रोगमुक्त आणि मजबूत पीक वाढीसाठी दशपर्णी अर्काची फवारणी करणे खूप उपयुक्त ठरते. चिखलदरा तालुक्यातील 21 गावातील महिला बचत गटांनी मेळघाट पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एकूण 5 हजार 400 लिटर दशपर्णी अर्क तयार केला आहे.
असा आहे दशपर्णी अर्क : जनावर बहुतांश ज्या वनस्पती खात नाही, अशा वनस्पतींपासून दशपर्णी अर्क मेळघाटातील महिला बचत गटाने तयार केला आहे. यामध्ये कडुनिंब, करंज, निरगुडी, रुई, बेशरम, महारुग, मोगली, एरंड, कन्हेर, धोत्रा, सिताफळ, रायमुनिया आदी वनस्पती वापरण्यात आल्या आहेत. यासाठी गोमूत्र, शेण, मिरची, लसूण, पाणी इत्यादी साहित्य वापरण्यात आले आहे. वनस्पतीचा सर्व पाला बारीक करून त्यामध्ये बाकीचे इतर मिश्रण टाकून त्याला सलग तीस ते पस्तीस दिवस ढवळावे लागते. या प्रक्रियेनंतर उत्तम प्रतीचा दशपर्णी अर्क तयार होतो. या अर्काला गाळून त्याची एकूण सहा महिन्यांपर्यंत शेतात फवारणी करता येते, अशी माहिती भामादेवी या गावातील अभिनंदन महिला शेतकरी बचत गटाच्या प्रमुख लता झाडखंडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
थेट शास्त्रज्ञ करतात मार्गदर्शन : दर शुक्रवारी आयोजित केली जाणारी शेती शाळा आम्ही सर्व बचत गटातील पंधराही महिला सोबत बसून पाहतो. या शेती शाळेच्या माध्यमातून थेट शास्त्रज्ञ आम्हाला विकसित शेती कशी करायची याबाबत मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनातूनच आम्ही आमच्या गावात चारशे लिटर दशपर्णी अर्क तयार केला, असे मेळघाटातील दुर्गम अशा तोरणवाडी गावातील अन्नपूर्णा महिला शेतकरी गटाच्या प्रमुख आणि गावच्या पोलीस पाटील रेश्मा कासदेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. जंगलातील विविध वनस्पतींचा पाला जमा करून आम्ही दशपर्णी अर्क तयार केला. आमच्या आरोग्यासह इतर सर्वांच्याच आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असणारा हा दशपर्णी अर्क आम्ही सर्व महिलांनी हसत खेळत तयार केल्याचे देखील रेशमा काजलेकर म्हणाल्या.
अर्काला दोनशे रुपये लिटर भाव : या दशपर्णी अर्क तयार करण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे एक पैसाही खर्च न करता घरच्या घरी हा अर्क तयार केला जातो. विषमुक्त पीक घेण्यासाठी हा अर्क अतिशय फायदेशीर आहे. याचे आर्थिक गणित बघितले तर, किमान दोनशे रुपये लिटर याप्रमाणे हा अर्क विकला जातो. चिखलदरा तालुक्यात महिलांच्या 21 बचत गटांनी एकूण तयार केलेल्या 5 हजार 400 लिटर दशपर्णी अर्काची किंमत आज 10 लाख 80 हजार एवढी आहे.
फवारणीसाठी कमी खर्च : या अर्थाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना फवारणीसाठी निश्चितच मोठ्या प्रमाणात कमी खर्च येतो. तसेच दशपर्णी अर्काच्या फवारणीमुळे शेतात उत्पादित होणारा माल हा विषमुक्त असतो, असे पाणी फाउंडेशनचे चिखलदरा तालुका समन्वयक देखील वैभव नायस 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. डिजिटल शेती कार्यशाळेच्या माध्यमातून कृषी विद्यापीठात विकसित झालेल्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती मेळघाटातील शेतकऱ्यांना दिली जाते. पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये चिखलदरा तालुक्यातील शेतकरी महिला आणि पुरुषांना प्रशिक्षण दिले जाते. शेतीवर होणारा खर्च कमी करून आपले उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जागृत करण्याचे प्रेरित करण्याचे कार्य देखील केले जात असल्याचे वैभव नायसे म्हणाले.