अमरावती - पोलीस व तहसीलदारांना अनेकदा निवेदन देऊनही अवैध दारू विक्री न थांबल्याने संतप्त महिलांनी अवैध दारू विक्रेत्याला चोप दिला. नांदगाव खंडेशवर तालुक्यातील फुबगाव येथे ही घटना घडली.
फुबगाव येथे कित्येक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे. याबाबत गावातील महिला बचत गटांनी तहसीलदार व पोलिसांना अनेकदा निवेदने दिली. त्यानंतर काही प्रमाणात दारू विक्रेत्यांवर कारवाई झाली. मात्र, काही दिवसांतच पुन्हा अवैध दारू विक्रेत्यांनी हौदोस घातला. गावात ठिक ठिकाणी खुले आम दारू विक्री होत असल्याने पुरुषांचे दारू पिण्याचे प्रमाणही वाढले. दारू सहज उपलब्ध होत असल्याने अनेक अल्पवयीन मुलेही दारूच्या आहारी जात आहेत. ज्या महिलांनी दारू विक्री विरोधात आवाज उठवला, त्यांना दारू विक्रेते अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देतात. या सर्व प्रकाराने संतप्त झालेल्या महिलांनी दारू विक्रेत्याला पकडून चोप दिला.
या प्रकाराने संपूर्ण गावात खळबळ उडाली. दारू विक्रेत्याला होणारी मारहाण बघण्यासाठी गावातील लोकांची चांगलीच गर्दी झाली होती. दरम्यान, पोलीस अधिकारी गावात आल्याचे समजताच दारू विक्रेत्याने गावातून पळ काढला. गावात रोज होणारी अवैध दारू विक्री केव्हा थांबणार असा प्रश्न संतप्त महिलांनी पोलिसांना केला आहे.