अमरावती - राहुल गांधी, सोनिया गांधी आणि संपूर्ण गांधी कुटुंब हे काँग्रेसच्या अतिशय निकट आहे. त्यांनी जे सहन केले आहे ते दुसरे कुणीच सहन केलेले नाही. आमच्या नेत्यांचा मान-सन्मान हा राखला गेला पाहिजे, त्यासाठी काही दिवसांपूर्वी केलेले ते ट्विट होते. ज्या कुणासाठी ते ट्विट होते, ते त्यांना समजले, असे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्य नाही, असे मत व्यक्त केले होते. त्यावर यशोमती ठाकुरांनी ट्विट करून सरकार टीकायचे असल्यास आघाडी धर्माचे पालन करण्याचा सल्ला कोणाचेही नाव घेता दिला होता. त्यानंतर अनेकदा ठाकूर यांना त्याविषयी विचारल्यानंतर त्यांनी या विषयी बोलण्याचे टाळले होते. मात्र, आज अखेर ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी मौन सोडत आपले मत व्यक्त केले.
रावसाहेब दानवेंना बदडले पाहिजे
दिल्लीतील आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे अजब वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा यशोमती ठाकूर यांनीही समाचार घेतला. असे वक्तव्य करणाऱ्या लोकांना बदडले पाहिजे असे यशोती ठाकूर म्हणाल्या. भरपूर वेळेला लोक आंदोलनाची नौटंकी करतात, परंतु या आंदोलनापासून ते लोक आता दूर आहेत, अशी टीका नाव न घेता यशोमती ठाकूर यांनी विरोधकांवर केली.
मूलभूत किंमत मिळाली नाही तर शेतकरी कसा जगेल? हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणे हे गरजेचे आहे. केंद्र सरकारने कृषी कायदा आणला आहे, तो व्यापाऱ्यांच्या फायद्याचा आहे आणि तो शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आहे. म्हणून हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला महाविकास आघाडी व आमच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकार ने वास्तविकतेकडे वळले पाहिजे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
पंतप्रधान मोदींवर टीका
एकीकडे शेतकरी आंदोलने करत असताना आपले पंतप्रधान हे वाराणसीमध्ये दीपोत्सव साजरा करत होते. तुम्ही मोराला, पोपटाला हात लावून काय सिध्द करता? शेतकऱ्यांचे दुःख आपल्याला समजले नाही तर हा देश नष्ट होईल, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.