अमरावती - जिल्ह्यातील वरुड तालुक्यात येणाऱ्या बेनोडा शहिद नजीकच्या पळसोणा गावात पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. दसरी साहेबराव उईके (वय ४३) रा. पळसोणा असे या आरोपी पत्नीचे नाव आहे, तर साहेबराव गोमाजी उईके (वय 48) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
पती- पत्नी दोघेही दारूडे
या दोघांनाही दारूचे व्यसन होते, त्यामधून नेहमीच पती-पत्नीमध्ये भांडणे होत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. दोघेही शेतात मजुरी करत होते. कालही ते एकाच शेतात कामासाठी गेले होते. त्यांचा विवाह 16 वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना एक 14 व एक 12 वर्षांची अशा दोन मुली आहेत. दोघेही कामावरून आल्यानंतर दारू प्यायचे, दारूच्या नशेत त्यांच्यामध्ये अनेकदा वाद व्हायचा.
दोघांमध्ये झाली हाणामारी
दरम्यान मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास देखील त्यांच्यामध्ये असाच वाद झाला, वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले, त्यांच्यामध्ये रोजच वाद होत असल्याने त्यांचा वाद सोडवण्यासाठी देखील कोणी जात नसत, मारहाणीदरम्यान पत्नी दसरी हिने पती साहेबराव उईके यांना काठीने मारहाण केली. भांडण मिटल्यानंतर ते दोघेही झोपले मात्र सकाळी साहेबराव हे उठलेच नाहीत, त्यांचा झोपेतच मृत्यू झाला. काठीचा घाव डोक्यात लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
पोलिसांकडून तापासाला सुरुवात
घटनेची माहिती मिळताच बेनोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद सरकटे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. प्राथमिक माहितीवरून मृताच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.