अमरावती - मोबाईल आणि त्या मोबाईल मधील असलेले व्हाट्सअप तुमच्या-आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. या व्हाट्सअपच्या माध्यमातून प्रत्येक घडामोड क्षणार्धात आपल्याला माहीत होते. लोकांना जुळवून ठेवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप तयार केले जाते आणि त्या ग्रुपवर माहितीची देवाण-घेवाण केली जाते. त्यामुळे व्हॉट्सअपचा चांगला उपयोग होत असला तरी अनेकजण काम नसताना बिनकामाचे संदेश टाकतात आणि याचा नाहक त्रास हा गृपमधील इतर सदस्यांना होतो. मॅसेज टाकू नका असे वारंवार एडमिन सुद्धा सांगतो. परंतु काही सदस्य ऐकत नाही. त्यामुळे अमरावती मधील एका ग्रुप ऍडमिनने शक्कल लढवली आणि एक दोन नव्हे तर साडेदहा हजारांचा दंड हा सदस्यांकडून वसूल करण्यात आला.
ग्रुप ॲडमिनचा दणका -
मोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा व्हाट्सअप ग्रुप आहे. 'आमची जिल्हापरिषद' या ग्रुपमधील 21 सदस्यांकडून दंड वसूल करण्यात आला. या सर्व सदस्यांवर ग्रुपचे नियम मोडल्याप्रकरणी ॲडमिनने कारवाई केली. अनेक शिक्षक विनाकारण अनावश्यक मॅसेज टाकत होते. ग्रुप अॅडमिनकडून त्यांना वारंवार समज देखील दिली होती. मात्र अॅडमीनचा आदेश कोणीच मनावर घेतला नाही. त्यामुळे ॲडमिन मनीष काळे यांना एक भन्नाट आयडिया सुचली. त्यानुसार जो कोणी ग्रुपचे नियम मोडेल त्याच्याकडून प्रत्येकी 500 रुपये वसूल करण्याचे फर्मान सोडले.
दंडाची रक्कम कोविड सेंटरला -
जवळपास ३२ सदस्यांनी हा नियम तोडला. त्यापैकी 21 सदस्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपये असा एकुण दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ॲडमिनने दंडाची रक्कम स्वतःजवळ ठेवली नाही तर या शिक्षकांनी एक अभिमानास्पद पाऊल उचलले. जमा झालेले तब्बल साडे दहा हजार रुपये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी उभारलेल्या कोविड सेंटरला मदत निधी म्हणून दिला. व्हाट्सअप ग्रुप हा उचललेले पाऊल हे धडा शिकवणारे ठरले. सदस्यांना दंड देण्यात आल्याची ही महाराष्ट्रातली पहिलीच घटना असावी.