अमरावती - जिल्ह्यातील तिवसा तालुक्याला दुष्काळाच्या प्रंचड झळा सोसाव्या लागत आहेत. तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपायोजना करण्यात आली नाही. एवढेच नाहीतर मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या शिरजगावला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
तिवसा तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी कोरड्या नदीपात्रात अनेक आंदोलनेदेखील केली. पाण्याअभावी येथील संत्रा बागा वाळायला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील पाण्याची पातळी खालवली असल्याने अनेक गावे तहानलेली आहेत. अशा भयाण परिस्थितीतही प्रशासनाने तिवसा तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळले आहे. तसेच नागरिकांना पाण्याचा पुरवठाही योग्य प्रमाणात केला जात नाही. त्यामुळे येथील नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यात दुष्काळी आणि पाणी टंचाईची परिस्थिती असतानासुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या शिरजगाव मोझरी गावाच्या पाणी पुरवठ्याच्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शिरजगाव पाणी पुरवठ्याच्या जलवाहिनीला एकूण चार एअर व्हॉल्व बसविण्यात आले आहेत. मात्र, या चारही एअर व्हॉल्व मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे शिरजगावात देखील पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
धक्कादायक म्हणजे शिरजगाव मो. येथील दुष्काळ परिस्थिती निवारण्यासाठी येथील ग्रामस्थांनी व्याजाने पैसे घेऊन जिल्हा परिषद मार्फत पेय जल योजनेच्या विहिरीचे खोलीकरण करून घेतले. मात्र, जिल्हा परिषदेकडून त्या मजुरीच्या पैशांचे बील देखील अपूर्ण देण्यात आले आहे. त्याच विहिरीवरून गावाकरिता पाणी पुरवठ्याच्या जलवाहीनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे.
या पाणी गळती प्रकरणी ग्रामपंचायत सदस्यांनी संबंधित कंत्राटदाराकडे वारंवार तक्रार दिली. तरीही पाण्याच्या होणाऱ्या नासाडीकडे शासकीय अधिकाऱ्यांसह सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. या जलवाहिनेचे काम करत असताना ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता ग्रामपंचायतीच्या पश्चात काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामात दुय्यम दर्जाचे साहित्य वापरले असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.