अमरावती - मागील २ वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाला नसल्याने महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याच्या मार्गावर आहे, विदर्भातील अमरावती विभागातही आगामी काळात दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. अमरावती विभागातील ५ जिल्ह्यांमधील पाणी साठवणूक प्रकल्पात केवळ २२ टक्केच पाणी साठा असल्याचे भीषण वास्तव मागील आठवड्यात आलेल्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीत समोर आले.
या वर्षी चांगला पाऊस न झाल्याने पाण्यासाठी बिकट परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. अमरावती जिल्ह्यासह विभागातील मोठे, लघु, मध्यम प्रकल्प हे पाण्याअभावी भरलेच नाही. त्यातच २०१७ मध्ये सुद्धा फार समाधानकारक पाऊस झाला नव्हता. उन्हाळ्याची चाहूल लागून थोडे दिवस उलटले असतानाच पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
अमरावती विभागात अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलडाणा अशा ५ जिल्ह्यांचा समावेश होतो. या ५ जिल्ह्यात ९ मोठे पाण्याचे सिंचन प्रकल्प आहेत. वाशिम जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नाही. विभागात एकूण मध्यम प्रकल्पाची संख्या ही २४ असून उर्वरित प्रकल्प हे लघु प्रकल्प आहेत. मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांचा विचार करता विभागात एकूण ५०२ प्रकल्प आहेत. ज्याचा साठा मागील आठवड्यात केवळ २२ टक्के होता.
ग्रामीण भागातील विहिरी पाणीसाठे आटण्याच्या मार्गावर असल्याने पाचही जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी कपात प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील ९ गावात ७ ते ८ टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव आदेश तेथील तहसीलदारांनी दिला आहे. अमरावती जिल्ह्यात अनेक अशी गावे आहेत की, तिथे २ आठवडे पाणी पुरवठा होत नाही. त्यातच अल्प पावसामुळे विहिरीमधील पाण्याची पातळी ही दिवसेंदिवस खाली जात आहे. वरून उन्हाचे चटके आणि पायाला जमिनीचे चटके घेऊन अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील अनेक गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.