अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चौकात शुक्रवारी सायंकाळी जीवन प्राधिकरणाची पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या १२ तासापासून पाण्याचा अपव्यय सुरू असून जीवन प्राधिकरणाने याबाबत गांभीर्य दाखवले नसल्याने आश्चर्य आणि रोष व्यक्त केला जात आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात सध्या अल्प पाणीसाठा असल्याने २ दिवसाआड पाणी येत आहे. अप्पर वर्धा धरणातून शहराला पाणी पुरवठा करणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची ही मुख्य पाईपलाईन आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ लगत पाईपलाईनचा कॉक तुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरू असतानाच शुक्रवारी विद्यापीठ चौकात लाखो लिटर पिण्याचे पाण्याची नासाडी होत आहे.
परिसरातील नागरिकांनी याबाबत जीवन प्राधिकरणाकडे माहिती दिली आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. लाखो लिटर पाणी लगतच्या मैदानात आणि उड्डाणपुलाच्या खालून वाहत आहे.