अमरावती - हरीसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्त्या प्रकरणात अटकेत असणारा निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हा अद्यापही तात्पुरत्या कारागृहातच आहे. त्याचा कवारंटाईन कालावधी संपला असतानाही त्याची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काय आहे प्रकरण?
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत येणाऱ्या हरीसाल येथील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. वरिष्ठ अधिकार्यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे माध्यमाद्वारे समोर आले. दीपाली चव्हाण यांनी सुसाइड नोटमध्ये काही वरीष्ठ अधिकार्यांच्या नावाचा उल्लेख केला होता. या अनुषंगानेच उपवनसंरक्षक शिवकुमार यांना ताब्यात घेण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हा आरोपी आहे.