अमरावती - जिल्ह्यात मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. शेकडो हेक्टरवरील भाजीपाला पावसामुळे खराब झाल्याने बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे लोकांच्या रोजच्या जेवणातल्या भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांसह नोकरदार वर्गाच्या खिशाला कात्री बसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या भाज्यांचे दर दुप्पट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सततच्या पावसामुळे भाजीपाल्याने नुकसान; बाजारपेठेत आवक घटली, भावही वधारले जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. यावर्षी लॉकडाऊनमुळे उन्हाळ्यात हजारो शेतकऱ्यांना भाजीपाला फेकून द्यावा लागला होता. दरम्यान, आता शेतकऱ्यांनी कसे-बसे सावरत पुन्हा भाजीपाल्याची लागवड केली. मात्र, मागील दहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. बाजारपेठत भाजीपाल्याचे दर दुप्पट झाले असले तरी शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
मागील वर्षी या महिन्यात २० ते ३० रुपये किलो असणारी पालक भाजी यंदा मात्र १०० ते १२० रुपये किलो विकली जात आहे. रोज दैनंदिन भाज्यांना चव आणणाऱ्या कोथिंबीरचे भाव २०० रुपये किलोवर गेले आहे. सध्या गौरी-गणपतीचा उत्सव सुरू असल्याने बाजारपेठेत भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. मात्र, पावसामुळे आवक कमी झाल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.जिल्ह्यातील मोझरी येथील बागायतदार शेतकरी अनिल कांडलकर यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यामध्ये ते भाजीपाल्याचे उत्पादन घेत असतात. लॉकडाऊनमध्ये तोटा सहन करून त्यांनी भाजीपाला विकला. दरम्यान, आता भाजीपाला पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तो कमी करण्यासाठी ते फवारणी करतात. परंतु, सततच्या पावसामुळे त्या फवारणीचा काहीच फायदा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. अनिल कांडलकर यांच्या शेतात पालक, कोथिंबीर, काकडी, टोमॅटो, वांगे ही पिके असून पावसामुळे या सर्वच पिकांना फटका बसला आहे. भाजीपाल्याचे दर (ठोक आणि चिल्लर) -
बटाटे -30-40 रु
वांगे- 35-60 रु
पालक- 120-150 रु
मिरची- 60-80 रु
टमाटर- 50-60 रु
गोबी- 35-50 रु
कोथिंबीर- 200-260 रु
गाजर- 60-120 रु
काकडी- 40-60 रु
भेंडी- 20-40 रु
शेंगा-30-50 रु
कारले- 30-50 रु
दोडकी- 40-60 रु
लवकी- 60-80 रु
कवडे- 25-30 रु
मेथी- 200-240 रु