अमरावती - वडाळी तलाव हा अमरावतीतील पर्यटनाचे मुख्य केंद्र आहे. महात्मा गांधींनी या तलावाला भेट दिली असल्याने याचे ऐतिहासिक महत्व आहे. ब्रिटीशांनी बांधलेल्या या तलावाकडे सिंचनाचा उत्तम नमुना म्हणून पाहिले जाते. पण, आता हा तलाव कोरडा पडला आहे. तलावाच्या दुरवस्थेबद्दल प्रशासनाला वारंवार सूचना दिल्या आहेत. मात्र प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही, अशी तक्रार येथील नागरिकांची आहे.
शहराच्या पूर्व आणि दक्षिण भागातील टेकड्यांवरून खाली वेगाने येणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी सन १८८९ मध्ये इंग्रज शासकांनी वडाळी तलाव बांधला. या तलावाला सहाय्यभूत म्हणून फुटका तलाव आणि भवानी तलावांची निर्मिती १८९९ मध्ये करण्यात आली. पूर्वी कॅम्प परिसरात वडाळी तलावातून पाणी पुरवठा केला जात होता. त्यासाठी तलावाच्या पायथ्याशी जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली होती. टेकड्यांवरुन वाहत येणारे पाणी आधी भवानी तलवात आणि भवानी तलावाची पातळी ओलांडल्यावर पाच किलोमीटर अंतरावरील फुटक्या तलावात यायचे. फुटका तलाव तुडुंब भरल्यावर त्यातील पाणी वडाळी तालावत पोचते अशी व्यवस्था आहे.
वडाळी तलावाचे पाणलोट क्षेत्र २ चौरस मैल असून, तलावाची क्षमता ५ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. या तलावाने २१ हेक्टर जागा व्यापली आहे. त्यापैकी निव्वळ तलावाखालील जमीन २०.९९ हेक्टर आहे. उद्यानाच्या वापरातील जागा २.८१ हेक्टर आहे. तलावाची मध्यभागाची खोली १८ मिटर असून, उन्हाळ्यात ती १० ते १२ मिटर खाली येते.
यावर्षी तर परिस्थिती बिकट आहे. तलावाच्या उत्तरेकडे मोठ्या भिंतीच्या तुलनेत पश्चिम भागात अतिशय लहान भिंत आहे. तलावाच्या उत्तरेस भिंतीलगत जलतरण तलाव आहे. तलावाच्या निर्मितीनंतर तब्बल दोन पिढ्यांनी एक आणा शुल्कात जलतरण तालावर पोहण्याचा आनंद लुटला. तलावाशेजारी मोठे कारंजे होते. ते आजही आहेत. मात्र, आज त्यांची अवस्था वाईट आहे. आज येथील पाणी शुद्धीकरण केंद्रही भग्न झाले असून, ही जागा महापालिकेने भाडेत्तत्वावर हॉटेलसाठी दिली आहे.
१९३० साली सेवाग्राम येथून महात्मा गांधी अमरावतीत आले तेव्हा त्यांनी मार्गात असणाऱ्या वडाळी तलावाला भेट दिली होती. असा इतिहास आणि महत्व असणाऱ्या वडाळी तलावाची गत १५ वर्षांपासून दूरवस्था झाली आहे. तलाव साफ करण्याकडे महापालिकेने कधीही लक्ष दिले नाही. १५ वर्षांपूर्वी या तलावातून चार ते पाच हजार ट्रक गाळ महापालिकेने उपसला होता. त्यानंतर तलावाकडे कधीही लक्ष दिले नाही. आज तलावात अतिशय घाण, कचरा आणि विणकेणच्या वनस्पती वाढल्या आहेत.
तलाव जवळपास कोरडा पडल्याने परिसरातील विहीरी आटल्या आहेत. महापालिका प्रशासनाला वारंवार पत्र देऊनही महापालिका आयुक्त या महत्वाच्या विषयाकडे लक्ष देत नाहीत. असे वडाळी प्रभागाच्या नगरसेवक सपना ठाकूर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाल्या.
मे महिन्यात या तलावात एक थेंबही पाणी राहणार नाही अशी परिस्थिती आहे. आता महिनाभरात तलावातील गाळ उपसणे अत्यंत गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाने याकडे खरोखर गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी वडाळी परिसरातील नागरिकांनी केली आहे.