अमरावती - जिल्ह्यातील धारणी पासून जवळच असलेल्या मध्यप्रदेशातील खकनार जंगलातून ८ बनावट पिस्टलसह बुऱ्हाणपूर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. या घटनेने मेळघाटमध्ये खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे धागेदोरे मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरसह मेळघाट आणि बुलडाणा जिल्ह्यात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
अशी केली कारवाई
महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पाचोरी गावात शस्त्रे बनविण्याचे घरगुती कारखाने अनेक दिवसांपासून सुरू आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार बुरहानपूरचे पोलीस अधीक्षक राहूल लोढा यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दांत पहाडाजवळ दोन जणांना आडवले, त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे जपानी मॉडलच्या 8 बनावट पिस्तूल आढळून आले आहेत. दानसिंग प्यारसिंग सिकलीगड आणि हरपाल सिंग ओंकारसिंग अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान या तरुणांना अटक केलेल्या जागेपासून अवघ्या काही अंतरावर बुलडाणा जिल्ह्यातील पाचोरी गाव आहे. त्यामुळे या दोघांचे बुलडाणा कनेक्श समोर येण्याची शक्यता आहे.