अमरावती- आज जागतिक महिला दिवस. या दिवशी समाजातील प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो. आज परिस्थितीशी दोन हात करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या काही महिलांचा परिचय आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. रिना राऊत आणि शुभांगी तायडे, असे या महिलांची नावे असून त्या वलगाव येथील पेट्रोल पंपावर काम करतात.
रिना राऊत यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या समोर उदर्निवाहाचा प्रश्न उभा ठाकला होता. दोन मुली त्यांचे शिक्षण या सर्व गोष्टी कशा पूर्ण होईल ही चिंता त्यांना होती. मात्र, बिकट परिस्थितीची पर्वा न करता रिना यांनी काम करण्याचे ठरविले. त्यांनी वलगाव येथील पार्वती सर्वा पेट्रोलियम येथे काम करायला सुरुवात केली. येथे त्या लोकांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरायचे काम करतात. एरवी हे काम पुरुष करत असल्यामुळे सुरुवातील थोडी अडचण झाली. मात्र, नंतर रिना या कामात निपून झाल्या. आज त्या महिन्याला ५ ते ६ हजार रुपये वेतन कमवत आहे आणि यातच आपले घर चालवत आहे.
महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. त्या पेट्रोलपंपावर काम करू शकतात तर त्या कुठे पण काम करू शकतात. या कामामुळे आज मी माझे घर चालवत आहे. माझ्या मुलांचे शिक्षण पूर्ण करत आहे, अशी भावना रिना राऊत यांनी व्यक्त केली. रिना प्रमानेच शुभांगी तायडे देखील पार्वती सर्वा पेट्रोलियम मध्ये काम करतात. त्यांना देखील पैशांची गरज होती. त्यांनी देखील इतरत्र काम शोधले. मात्र, त्यांना निराशाच हाती लागली. मग त्यांनी पेट्रोलपंपावर काम करण्याचे ठरविले. आज रिना प्रमाणे त्या देखील पेट्रोल भरण्याचे काम करत आहे आणि आपले घर चालवत आहे. महिला कुठलेही काम करू शकतात. आज महिला पुरुषांच्या बरोबरीत आहे, अशी भावना शुभांगी यांनी व्यक्त केली.
आज महिला दिनानिमित्त पार्वती सर्वा पेट्रोल पंपाचे मालक प्रदीप चौधरी आणि संगीता चोधरी यांनी देखील या दोन महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेतली. त्यांनी रिना आणि शुभांगी या दोघांचा सत्कार करत त्यांना साडी भेट दिली. विशेष म्हणजे, पार्वती सर्वा पेट्रोल पंपाचे कामकाज देखील प्रदीप चौधरी यांच्या पत्नी संगीता चौधरी पाहतात. गेल्या दोन वर्षापासून आमच्या पेट्रोल पंपावर तीन, चार महिला काम करत आहेत. जेवढ्या चांगल्याने पुरुष नाही करू शकत तितक्या चांगल्या प्रकारे या महिला आपले कर्तव्य बजावत असल्याचे संगीता चौधरी यांनी सांगितले. त्याचबरोबर, महिला प्रमाणिकपणे काम करतात म्हणून या भावनेने आम्ही महिलांना आपल्या पेट्रोलपंपावर कामाला ठेवले आहे, असे प्रदीप चौधरी यांनी सांगितले.
हेही वाचा- महिला दिनाच्या पूर्वसंध्येला डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने आदिवासी महिलेचा मृत्यू