अमरावती - सातत्याने होणारे बाल मृत्यू, गर्भवती महिलांचे मृत्यू यामुळे मेळघाट कायम चर्चेत असते. मेळघाटात दोन गर्भवती महिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. अमरावतीच्या धारणी तालुक्यात या घटना घडल्या.
धारणी तालुक्यातील धुळघाट रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सावलीखेडा हे गाव येते. या गावातील ममता चिमोटे या गर्भवती महिलेची घरीच प्रसूती झाली. प्रसूतीदरम्यान या महिलेला अतिरक्तस्राव झाला. याबाबत गावातील आरोग्य सेविकेला माहिती देण्यात आली. मात्र, तिने सुरुवातीला येण्यास टाळाटाळ केली. आरोग्य सेविका मदतीला येईपर्यंत प्रसूती झालेल्या महिलेचा मृत्यू झाला.
हेही वाचा - अप्पर वर्धा धरणाच्या कालव्यात तरुण गेला वाहून; मुख्य पुलावरून तोल गेल्याने घडली दुर्घटना
चाकर्दा येथील सोनकी दुर्वे या गर्भवतीची प्रथम प्रसूती होती. तिला श्वसनाचा त्रास होत असल्याने गावातील आशा कार्यकर्ता आणि आरोग्य सेविकांनी तिला धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिला महात्मा गांधी आदिवासी रुग्णालय (महान)या स्वयंसेवी संस्थेचे डॉक्टर आशिष सातव यांच्याकडे पाठवले. डॉक्टर सातव यांनी महिलेला हृदयाचा आजार असल्याचे निदान केले.
पुढील उपचारांसाठी गर्भवती महिलेला अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात आणले मात्र, उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. या महिलांना वेळीच उपचार मिळाले असते तर यांचा जीव वाचला असता. एकाच दिवशी दोन गर्भवती महिला कुचकामी आरोग्य यंत्रणेच्या बळी ठरल्या, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.