अमरावती - हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पश्चिम विदर्भात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. अमरावती जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मध्यम प्रकल्प असलेल्या पूर्णा प्रकल्पात ६० टक्के जलसाठा असल्याने या प्रकल्पाची जलाशय पातळी ४४८.५२ मीटर आहे. यात २१.२५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे दोन दरवाजे ५ सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. या दरवाजामधून ७ घनमीटर प्रति सेंकदाने पाण्याचा विसर्ग केला जातो आहे. पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अमरावतीमध्ये 40 टक्के जलसाठा -
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत किंचित वाढ होत आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणामध्ये जलसाठा हा 45.39 टक्के आहे. पश्चिम विदर्भातील सर्व मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात जलसाठा हा केवळ 35 टक्क्यांवर आहे. तर अमरावती जिल्ह्यातील पाणी प्रकल्पातील जलसाठा हा 40 टक्क्यांवर आहे. दरम्यान, या सर्व जलाशयांमध्ये पाणी पातळी वाढण्यासाठी आणखी मुसळधार पावसाची गरज आहे.
हेही वाचा - VIDEO : हिमाचलमध्ये ढगफुटी.. मुसळधार पावसाने रस्त्यांना नाल्याचे रुप, कार व अन्य वाहने गेली वाहून
दरम्यान, सध्या ओडिशा-आंध्रप्रदेश किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. सोबतच पूर्व-पश्चिम कमी जास्त दाबाची शियरझोन मध्य भारतावर आहे. त्यामुळे यांच्या प्रभावामुळे येत्या १२, १३, १४ जुलै या कालावधीत विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. आज (मंगळवारी) विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर १५ जुलैपासून विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता असल्याचा अंदाजदेखील हवामान विभागाने वर्तविला आहे.