अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या चिखलदरा वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गगमल वन्यक्षेत्रात गस्तीवर असणाऱ्या वनरक्षक आणि वन मजुरावर शनिवारी (दि. 12 सप्टें.) अस्वलाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अमरावतीला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
वनरक्षक निलेश बेढेकर आणि वनमजूर राजपाल शालीकराम जमुनाकार असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहे आहेत. ढाकना वनपरिक्षेत्र कार्यालयात हे दोघे कार्यरत आहेत. गुगमल वन परिक्षेत्रात ते नियमित गस्तीवर असताना त्यांच्या समोर अचानक मादी अस्वलाने हल्ला केला. त्या वनरक्षक व मजुराचा आरडाओरड ऐकून परिसरातील काही लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही अस्वलाच्या तावडीतून सोडविले.
दोघांच्याही डोक्याला आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना तात्काळ धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अमरावतीला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे ढाकण वन्य परिक्षेत्रात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - नांदगाव खंडेश्वर पाण्यात आढळला जिवंत नारू सदृश्य जंतू ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात