अमरावती - राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने शेतकरी पेरणीसाठी लगबग करीत आहेत. बियाणे खरेदीसाठी बाजारात शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. अशातच अनेक ठिकाणी बोगस बियाण्याची विक्री देखील जोरात सुरू आहे. त्यामुळे कृषी विभागाने आता धाडसत्र राबवायला सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील अंजनसिंगी परिसरात काही व्यक्ती अनधिकृत असलेल्या कपाशी बियाण्याची विक्री करत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्याआधारे रविवारी रात्री पोलिसांनी सापळा रचला. बनावट ग्राहक बनून एचटीबीटी कपाशीच्या बॅग मागितल्या. त्या बॅग घेऊन आल्यानंतर आरोपींला अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या साहाय्याने ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून लाखो रुपयांचे तब्बल १८९१ कपाशी बियाणांची पाकीटे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सतीश ठाकरे, प्रमोद देवघरे या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अमरावती दादासो पवार, विभागीय गुणवत्ता नियंत्रण, जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी अधिकारी उज्वल आगरकर, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अनंत मसकरे कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनी केली.
कृषी विभागाने केलेल्या या कारवाईमुळे बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.