अमरावती - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून गुरुकुंज मोझरी येथे साकारलेले प्रार्थना मंदिर हे जीर्ण झाल्याने नवीन प्रार्थना मंदिर हे बांधण्यात आले आहे. त्यामुळे जुने प्रार्थना मंदिर पाडले जाणार, अशी भीती काही गुरुदेव भक्तांना आहे. जुने मंदिर पाडण्याच्या निर्णयाला गुरुदेव भक्तांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. आज राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी निषेध आंदोलन करत प्रार्थना मंदिर जतन करून ठेवण्याची मागणी गुरुदेव भक्तांकडून करण्यात आली. या वेळी, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाला या मागणीचे निवेदन देण्यात आले.
हेही वाचा - नाशिक: बिबट्याच्या जबड्यातूून ससा फरार... शिकारीचा व्हिडिओ पाहाच!
नवीन मंदिराचे काम ८० टक्के पूर्ण
जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भव्य आश्रम आहे. राष्ट्रसंताच्या संकल्पनेतून व गुरुदेव भक्तांच्या श्रमदानातून गुरुकुंज मोझरी येथे महाराजांचे आश्रम व समाधी स्थळ बांधण्यात आले आहे. याच आश्रमात शासनाच्या निधीअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दी आराखड्यातून नवीन भव्य प्रार्थना मंदिर बांधण्यात आले आहे. त्यामुळे जुने प्रार्थना मंदिर पडण्याचा निर्णय आश्रमातील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने काही महिन्यांअगोदर घेतला होता.
कुठलीही वास्तू न पाडू देण्यावर ठाम
आश्रमातील प्रत्येक वस्तू ही राष्ट्रसंताच्या स्पर्शाने पावन झाली असून लाखो गुरुदेव भक्तांच्या भावना आश्रमातील प्रत्येक वस्तूशी जोडले गेलेले असल्याने आश्रमातील कुठलीही वास्तू पाडू न देण्याचा निर्धार गुरुदेव भक्तांनी केला आहे. महाराजांचे प्रार्थना मंदिर पाडण्याच्या निर्णयाला समस्त गुरुदेव भक्तांकडून विरोध केला जात आहे. याच अनुषंगाने आज राष्ट्रसंताच्या समाधीस्थळी काही गुरुदेव भक्त व महिलांनी निषेध आंदोलन करून महाद्वारस्थळी भजन केले. या वेळी, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळला जुने प्रार्थना मंदिर पडू नये, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
हेही वाचा - जळगाव : घरपट्टी थकविल्याने बारा ग्रामपंचायत सदस्यांना दणका; जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्रतेची कारवाई