अमरावती - केंद्र शासनाच्या नव्या कृषी कायद्याविरोधात आज प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर दिल्लीत शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर रॅली निघाली होता. त्यांना समर्थन देण्यासाठी अमरावतीत शेतकरी आणि विविध कामगार संघटनांच्यावतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. अमरावतीकरांचे लक्ष वेधणारी ही ट्रॅक्टर रॅली शांततेत पार पडली.
ट्रॅक्टर रॅलीने वेधले अमरावतीकरांचे लक्ष -
शहरातील नेहरू मैदान येथून दुपारी 12 वाजता या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाली. 30 ते 40 ट्रॅक्टरसह दुचाकीस्वार या रॅलीत आहभागी झालेत. राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इर्विन चौक, पंचवटी मार्गे श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर या रॅलीचा समारोप झाला.
केंद्र शासनाचा केला निषेध -
कामगार संघटना, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मुस्लीम लीग अशा विविध राजकीय आणि कामगार संघटना ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झाल्या होत्या. कॉम्रेड तुकाराम भस्मे, बाबा भाकरे, प्रा प्रसंजित तेलंग, प्रा. भगवान फाळके, अशोक सोनारकार, इम्रान आश्रफी यांनी रॅलीचे नेतृत्व केले.
डॉ. पंजाबराव देशमुखांच्या पुतळ्याला केले वंदन -
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात निघालेली ट्रॅक्टर रॅली पंचवटी चौकात पोचली असता, चौकात असणाऱ्या देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला आंदोलकांनी अभिवादन केले. तसेच यावेळी ट्रॅक्टर रॅली दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.
हेही वाचा - दिल्लीतील अराजकतेवर आता जो बायडेनचा राजीनामा मागणार का, राऊतांचा भाजपाला टोला