अमरावती - शहरालगत असणाऱ्या वडाळी, पोहरा, मालखेड जंगलात अनेकांना वाघ आढळून आला आहे. तसेच अमरावती-चांदुर रेल्वे मार्गावर अनेकांना व्याघ्र दर्शन घडले आहे. त्यामुळे बऱ्याच काळानंतर समृद्ध झालेल्या या जंगलात आता वाघाचे ही वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वडाळी, पोहरा हे जंगल गेल्या काही वर्षापासून घनदाट झाले आहे. या जंगलांमध्ये बिबट्याचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. बिबट सोबतच रानगवे, चितळ, हरीण, ससे या प्राण्यांसह मोरांचे वास्तव्य या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. या जंगलातील बिबट राज्य राखीव पोलीस दल वसाहतीसह संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात अनेकदा आढळून आले आहेत. अमरावती- चांदुर रेल्वे मार्गावरही अनेकांना बिबट दिसून आले आहेत. राज्य राखीव पोलीस दल वसाहत परिसरात एका घरात शिरून बिबट्याने केलेली कुत्र्याची शिकार केली होती. तसेच या भागात असणाऱ्या वैष्णोदेवी मंदिर परिसरात गायीच्या गोट्यावर हल्ला करून बिबट्याने गायीची शिकार केली होती. बिबट्यांचे अस्तित्व जाणवणाऱ्या अनेक घटना गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत.
आता वडाळी पोहरा आणि चिरोडीच्या जंगलात वाघ फिरत असल्याचे अनेकांना आढळून आले आहे. या जंगलात यापूर्वीही वाघ आढळून आला होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या भागात वाघ आढळला नाही. आता मात्र जंगलात असणारा वाघ अनेकांना रस्ता ओलांडताना आढळून आला आहे. विशेष म्हणजे वन्यजीव अभ्यासकांना वडाळी जंगल परिसरात वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. वाघाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या जंगलात वाघ असल्याचे अधिकृतरित्या स्पष्ट केले नसले तरी गेल्या काही दिवसांपासून अनेकांना वाघ आढळून आले आहेत. जंगलातील काही महत्त्वाच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्याची तयारी वनविभागाने केली आहे. वाघ हा एका ठिकाणी जास्त काळ थांबत नाही. येत्या काही दिवसात वाघ असो वा बिबट या वन्य प्राण्यांबाबत जनजागृती करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दल वसाहत, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसर आणि जंगलालगतच्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने विशेष कार्यक्रम वनविभागाच्यावतीने राबविला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना वडाळी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या पोहरा- मालखेड जंगलात वाघाचे संचार असल्याच्या अनेक खुणा मिळाल्या असल्याचे सांगितले. या भागात यापूर्वीही वाघ दिसून आला आहे. 2014 पासून सतत वाघ या परिसरात असल्याचे पुरावे समोर आले आहेत. आताही या भागात अनेकांना वाघाचे दर्शन घडले असून जंगल समृद्ध झाल्यामुळे पुन्हा एकदा या भागात वाघ संचार करत असल्याचे यादव तरटे म्हणाले.