अमरावती - पदोपदी संकट आणि या संकटांच्या सामन्यातून नवी ऊर्जा मिळविणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांना या जगात सर्व नश्वर आहे. मात्र, विचार, तत्व आणि स्वप्न नष्ट होत नाहीत, असा विश्वास असल्यानेच ते 'वन मॅन टू आर्मी' ठरलेत, असे मत नामवंत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केले. गांधीजींना महात्मा संबोधणारे पहिले व्यक्ती सुभाषचंद्र बोस होते. टागोरांच्या जन-गण-मन या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा देणारेही सुभाषचंद्र बोस हेच पहिले व्यक्ती असून जय हिंद हा नारा देशाला सुभाषचंद्र बोस यांनीच दिला.
आम्ही सारे फाउंडेशन, मानस उपचार केंद्र आणि टोमोय स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील श्रीमती विमालाबाई देशमुख सभागृहात डॉ. आनंद नाडकर्णी यांची तीन दिवसीय हेरिटेज व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये आज 'वन मॅन टू आर्मी-सुभाषचंद्र बोस' या विषयावर डॉ. आनंद नाडकर्णी यांनी दुसरे पुष्प गुंफले.
गांधीजींना महात्मा संबोधणारे पहिले व्यक्ती सुभाषचंद्र बोस हे होते. टागोरांच्या जण-गण-मन या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा देणारे सुभाषचंद्र बोस हेच पहिले व्यक्ती असून जय हिंद हा नारा देशाला सुभाषचंद्र बोस यांनीच दिला. 29 मे 1942 ला सुभाषचंद्र बोस आणि हिटलरची पहिल्यांदा भेट झाली. यावेळी माईन काल्फ या आपल्या चरित्र ग्रंथात भारतविरोधी केलेल्या लिखाणात दुरुस्ती करा, असे सुभाषचंद्र बोस यांनी सांगण्याची जर्मनीत निर्वासित असून हिम्मत दाखवली होती हा प्रसंगही डॉ. नाडकर्णी यांनी सांगितला.
सुभाषबाबूंबद्दल बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक पाऊल हाच रस्ता या तत्वानुसार सुभाषचंद्र बोस यांनी जपानला जायचे ठरवले. अब्दुल हसन या एकमेव सहाकऱ्यासोबत ते पाणबुडीतून निघाले. दक्षिण आफ्रिकेत 'केप ऑफ गुड होप'ला वळसा घातल्यावर पुढव जपानच्या पाणबुडीत स्वार झाले. आणि मॅक्सउडा या नव्या नावाने सुभाषचंद्र बोस टोकियोला पोचले. तिथे जपानचे पंतप्रधान टोजो यांची भेट घेतल्यावर तुमच्या सैन्याच्या खांद्याला खांदा लावून आमचे सैन्य लढेल, असे बोस यांना टोजो यांना विश्वास दिला होता. 2 जुलैला सुभाषचंद्र बोस सिंगापूरला पोहचल्यावर इथे रासबिहारी बोस यांनी आधीच स्थापन केलेली इंडियन नॅशनल आर्मीची धुरा सुभाषचंद्र बोस सांभाळली. इथूनच 'चलो दिल्ली' अशी घोषणाही दिली होती.
आपले सैन्य वाढविण्याचे काम सुभाषबाबूंनी हाती घेतले. मोठा पगार आणि पदाची अपेक्षा करणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा साधे आणि सच्चे सैनिकांना त्यांनी महत्व दिले. त्यांच्या सैन्यातही इंग्रजांच्या हेरांचा शिरकाव झाला होता, अशा परिस्थितीत 'जय हिंद' अशी घोषणा देत सुभाषचंद्र बोस यांनी सैन्याचे बाळ वाढविले. गांधी, नेहरू, आझाद या अशी नावे बटालियनला दिली. जगातील पहिले महिलांचे सैन्य सुभाषचंद्र बोस यांनी तयार केले. त्याला राणी लक्ष्मीबाई बटालियन नाव दिले.
23 ऑक्टोबर 1943 ला स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रीमंडळ सिंगापूरमध्ये गठीत झाले आणि सुभाषचंद्र बोस हे भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून समोर आले होते. मात्र, केवळ भारत देशातून इंग्रज परत जायला हवेत, देश स्वतंत्र व्हावा, हेच विचार, तत्व आणि स्वप्न घेऊन लढणारे सुभाषचंद्र बोस हे 18 ऑगस्ट 1945 ला सिंगापूर येथून जपानला जायला विमानातून निघाले. मात्र, त्यानंतर ते कधीच परतले नाहीत. या शूर व्यक्तिमत्त्वाला सलाम, अशा शब्दात डॉ. नाडकर्णी यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला.