अमरावती - गेल्या एका वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून संपूर्ण देशावर कोरोनाचे भयंकर सावट आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेल्याने मजूर वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हाताला काम नसल्याने कुटुंबासाठी जेवणाचा खर्च कसा चालवावा असा बिकट प्रश्न अनेकांसमोर उभा आहे. मात्र अमरावतीच्या महादेव खोरी परिसरातील 'वऱ्हाड' या सामाजिक संस्थेचे रवींद्र वैद्य यांनी पुढाकार घेत अनेकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. तबल मागील 14 महिन्यांपासून ते गोरगरीब लोकांसाठी अन्नदान सुरू केले आहे. या अन्नदानाच्या माध्यमातून आतापर्यत लाखो लोकांची भूक मिटवली आहे.
14 महिन्यांपासून सेवा सुरू -
गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे पुणे-मुंबईचे मजूर गावाकडे परतत होते. त्या सर्वांची जेवणाची मोफत व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रवींद्र वैद्य यांनी केली. याकाळात अनेकांनी आपला रोजगार गमावला. अनेकांचे छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले. यासर्वांसाठी वऱ्हाड संस्थेतर्फे भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली. महादेव खोरी परिसरात रोज गरजूंसाठी जेवण तयार केले जाते. गेल्या 14 महिन्यांपासून दररोज हा मोफत भोजनदानाचा कार्यक्रम सुरू आहे.
झोपटपट्टी भागातही जेवणाची व्यवस्था -
शहरातील झोपटपट्टी भागात ऑटोरिक्षा किंवा टेम्पोने हे जेवण गरजूंना दिले जाते. अनेकजण याठिकाणी येऊन आपले जेवणाचे डबे घेऊन जातात. "जेवणाची सोय झाली म्हणून बरे नाहीतर भीक मागण्याची वेळ आली असती" असे डब्बे घ्यायला आलेले नागरिक सांगतात. वऱ्हाड या संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या या अन्नछत्रातून हजारो लोकांना दररोज वरण-भात-भाजी-पोळी असे चांगल्या दर्जाचे जेवण दिले जाते. सोबतच सणासुदीला येथे लोकांना गोडधोड जेवण सुद्धा दिले जात असल्याची माहिती अध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी दिली.