अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात प्रेम प्रकरणातून ६ जानेवारीला एका १८ वर्षीय महाविद्यायलीन तरुणीची चाकूने भोसकून एका माथेफिरूने हत्या केली होती. त्यानंतर त्याने स्वतःवरही वार करून घेतले होते. दरम्यान, माझ्या मुलीच्या हत्येमागे ठाणेदारच असल्याचा धक्कादायक आरोप तरुणीच्या आईने केला होता. त्यानंतर रवींद्र सोनवणे या ठाणेदाराचे निलंबन करून चौकशी करण्यात आली होती. आज या चौकशीचा अहवाल समोर आला असून ठाणेदार रवींद्र सोनवणे याने मुलीच्या घरी जाऊन तिच्याशी जवळीक साधल्याचे धक्कादायक वास्तव चौकशी अवाहालातून समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी ठाणेदार रवींद्र सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यानेच तरुणीचा छळ केल्याने आता पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तरुणीच्या हत्येच्या काही दिवसांपूर्वी आरोपी सागर तितूरमारे याच्या विरोधात तक्रार देऊनही ठाणेदार रवींद्र सोनवणे यांनी कुठलीही कारवाई न केल्याचा आरोप करत पीडित तरुणीच्या आईने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ठाणेदार सोनवणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. हत्येच्या काही दिवस अगोदरपासून ठाणेदार हा माझ्या मुलीला भेटायला व जबरदस्तीने जेवायला घरी येत होते. तसेच ते तिला वारंवार फोन करून त्रासही देत होते. तिला कॉलेजमध्ये भेटायला जात होते. वेगवेगळ्या नंबरवरून ठाणेदार माझ्या मुलीला त्रास देत होते, असाही गंभीर आरोप पीडित तरुणीच्या आईने केला होता.
हेही वाचा - पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली
त्यानंतर या हत्याकांडाचा तपास दत्तापूर ठाणेदार रवींद्र सोनवणे यांच्याकडून काढून त्यांना निलंबित करण्यात आले होते. हा तपास मोर्शीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फरताळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मागील अनेक दिवसांपासून या ठाणेदाराची चौकशी सुरू होती, आज या चौकशीचा अहवाल समोर आला असून या अहवालामध्ये ठाणेदाराने त्या पीडित मुलीशी जवळीक साधल्याचे चौकशीतून समोर आले आहे. आता या ठाणेदाराला आरोपी ठरवून त्याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - जागतिक वन्यजीव दिन विशेष : 'सह्याद्री'त चोरटी शिकार रोखण्याचे आव्हान