अमरावती : रामनवमीच्या पर्वावर गुरुवारी रात्री शहरातून भव्य मिरवणूक निघाल्यामुळे वाहतुकीचा ताण हा उड्डाणपुलावर आला होता. इर्विन चौक ते राजापेठ दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक उड्डाणपूलावरूनच वळविण्यात आली होती. उड्डाण पुलावरून मिरवणूक पाहण्यासाठी वाहने थांबू नये म्हणून उड्डाण पुलावर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलिसांना उड्डाण पुलावर भेगा पडल्याचे दिसले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चंद्रकांत म्हात्रे हे उड्डाण पुलावर पोहोचले. त्यांनी उड्डाणपुलावर पडलेल्या भेगाची पाहणी केली.
उड्डाणपूल एक महिना राहणार बंद : उड्डाण पुलावर पडलेल्या भेगांमुळे घाबरण्याचे कुठलेही कारण नसल्याचे अभियंता चंद्रकांत म्हात्रे यांनी सांगितले. मात्र सध्य परिस्थितीत उड्डाणपुलावरून वाहन चालविणे धोकादायक असल्याचे देखील ते म्हणाले. उन्हामुळे अशा भेगा पडल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र उड्डाणपुलावर चार ठिकाणी पडलेल्या भेगा नेमक्या कशामुळे पडल्या याचे ठोस कारण स्पष्ट झाले नाही. शुक्रवारी अधिकृत पाहणी केल्यावर उड्डाण पुलावर नेमक्या भेगा कशामुळे पडल्या हे समजणार आहे. दरम्यान वीस वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. या दुरुस्ती कामासाठी महिनाभर उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तर उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिसांनी बॅरिकेट्स लावले आहेत.
शहरात रामनवमी जन्मोत्सवासह : हिंदू धर्मीय बांधवांचा महत्त्वाचा दिवस म्हणजे रामनवमी आहे. हा दिवस गुरूवारी राज्यात विविध सांस्कृतिक, धार्मिक, कार्यक्रमांनी साजरा झाला. गुरुवारी रात्री अमरावती शहरातून भव्य मिरवणूक निघाल्यामुळे वाहतुकीचा ताण हा उड्डाणपुलावर आला होता. यंदा रामनवमी जन्मोत्सवासह गुरु पुष्य योग, अमृत सिद्धी योग, रवियोग, सर्वार्थ सिद्धी असे योग एकत्रितपणे आले होते. त्यामुळे रामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी लोकांचा उत्साह वाढला होता. अमरावती शहरात देखील रामनवमीचे उत्सवाचे वातावरण होते.