अमरावती - एकीकडे ऑनलाइन प्रक्रियेवर भर दिला जात असतानाच अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेत वेतन रखडले आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन हे ऑफलाईन पध्दतीने करण्यात आल्याने त्यांचे वेतन दिवाळी दरम्यान जमा झाले आहे. मात्र, अमरावतीतील 6 हजार शिक्षकांना अद्याप वेतन मिळाले नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे वेतन तातडीने देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. अन्यथा, शनिवारी 16 नोव्हेंबरला अमरावती जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.
हेही वाचा - अमरावतीमध्ये वाघाची दहशत, काळविटाला केले फस्त
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना वेतन हे ऑफलाइन पद्धतीने दिले जाते. मात्र, सरकारने ऑनलाईन पद्धतीचे घोडे नाचवत वेतन ऑनलाइन करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शिक्षण विभागाने ऑनलाइन वेतन प्रक्रिया सुरू केली. मात्र, या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी असल्याने शिक्षकांच्या खात्यात अजुनही वेतन जमा होऊ शकले नाही.