अमरावती - विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नागपूर अमरावतीत होणाऱ्या संत्राची ओळख आहे. इथला संत्राची चवही चांगली असल्याने त्याला मोठी मागणी असते. परंतु संत्रा उत्पादन करणारे शेतकरी हे वातावरणात झालेल्या बदलामुळे संकटात सापडले आहेत. मागील पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. याचा फटका बसला संत्रा फळाला आहे. वातवरणात झालेल्या बदलांमुळे संत्र्यावर "तडक्या" नावाचा रोग आला आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्राची गळती होत आहे. परिणामी संत्रा उत्पादक पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मात्र कृषी विभागाकडून संत्रा उत्पादकांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याचे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
'तडक्या' रोगाने संत्र्याचे २५ ते ३० टक्के नुकसान -
विदर्भाची संत्री आंबट गोड चवीसाठी ओळखली जाते. संत्राचे सर्वाधिक उत्पादन विदर्भातील नागपूर, अमरावती मध्ये होत. म्हणून या परिसराला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाते. इथला संत्रा देशविदेशात विकला जातो. सद्या मात्र संत्रावर तडक्या नावाचा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगामुळे संत्राची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे, तर संत्राला भेगा पडत आहेत. सद्यस्थितीत या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्रा उत्पादकांचे २५ ते ३० टक्के नुकसान झाले आहे.
झाडावरील संत्रा तडकून खाली पडतोय -
अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यातील बेलोरा येथील मंगेश राऊत यांच्याकडे 400 संत्राची झाडे आहेत. ते हवामान आधारित पीक विमा सुद्धा काढतात मात्र त्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नसल्याचे ते सांगतात. लॉकडाऊनमुळे अर्ध्या किमतीत संत्रा विकला गेला. आता तडक्या नावाचा रोग आल्याने झाडावरील संत्रा तडकून खाली पडत आहे. असे संत्रा उत्पादक शेतकरी मंगेश राऊत यांनी सांगितले.
संत्रा उत्पादकाला मार्गदर्शनाची आवश्कता -
वेळेत कृषी विभागाचे मार्गदर्शन न झाल्यास संत्राचे जास्त नुकसान होण्याची भिती उत्पादकांना लागली आहे. मागील वर्षी टाळेबंदीमुळे संत्राचे भाव घसरले होते. परिणामी बेभाव संत्रा विकावा लागला. यावेळी संत्रावर रोगाचा प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होत आहे. संत्रा उत्पादकांना गरज आहे योग्य कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची. कृषी विभाग मात्र संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर अद्याप पोहचले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.