अमरावती - चांदूर बाजार तालुक्यातील हिरुळपूर्णा भागात दोन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. यानंतर संबंधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच घरातील लहान मुले, महिला यांसह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ५१ नागरिकांना तिरूपती मंगल कार्यालयात हालवण्यात आले. मात्र या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींची कोणत्याही प्रकारची सोय करण्यात आली नाहीय. जेवणापासून अनेक जीवनावश्यक सोयींचा अभाव या ठिकाणी आहे.
७ मे रोजी मुंबई येथील एका पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी तीन वर्षांच्या मुलासोबत हिरुळपूर्णा येथे आपल्या माहेरी आली होती. यानंतर तालुका प्रशासनने त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेतील क्वारंटाईन सेंटरला दाखल केले. २१ मे रोजी या दोघांचे स्वॅब घेण्यात आले. आज (बुधवार) सकाळी या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी हिरुळपूर्णा, सर्फाबाद, शहापूर हे गाव सील करण्याचे आदेश दिले. गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. तसेच गावातील ३ किलोमीटर अंतरावर असलेला संपूर्ण भाग कंटेनमेंट झोन व १२ किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला. यानंतर रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले.
आता क्वारंटाईन केलेल्या नागरिकांमध्ये नाराजी आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने या ठिकाणीदेखील कन्टेनमेंट झोन्समध्ये वाढ झालीय. दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्वरित क्वारंटाइन करण्यात आले. तसेच अन्य काही व्यक्तींना ट्रेस करण्यात यश आले आहे.