अमरावती - शेतातील संत्रा विकल्यानंतर व्यापाऱ्याने फसवणूक केली, पैसे देण्यास नकार दिला. व्यापाऱ्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या शेतकऱ्यालाच पोलिसांनी मारहाण केली होती. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील अशोक पांडुरंग भुयार या शेतकऱ्याने व्यापाऱ्याकडून झालेली फसवणूक आणि पोलिसांकडून न्याय मिळण्याऐवजी झालेली मारहाण यामुळे मंगळवारी (दि.२२) आत्महत्या केली. शेतकरी भावाच्या आत्महत्येचा धक्का घेत मोठ्या भावाचा त्याच दिवशी रात्री ह्रद्यविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी अशोक भुयार यांनी मृत्यूपूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यानावे पत्र लिहून न्यायाची मागणी केली होती. या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह दोन व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शेतकऱ्याची व्यापाऱ्याकडून फसवणूक-पोलिसांकडून मारहाण
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील अशोक पांडुरंग भुयार या शेतकऱ्याने त्यांचा संत्रा बगीच्या व्यापाऱ्याला विकला होता. मात्र व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला पैसे न देता उलट मारहाण केली होती. तर याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी शेतकरी गेला असता. तेथेही शेतकऱ्याची तक्रार न घेता पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांनी शेतकऱ्याला मारहाण केली .त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने मंगळवारी सकाळी आत्महत्या केली होती. मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा यासाठी शेतकरी अशोक भुयार यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने चिठ्ठी लिहून घटनेची माहिती दिली होती. त्यामुळे मृतक शेतकऱ्याच्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता, अंजनगाव सुर्जीचे पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव, संत्रा व्यापारी शेख अमीन व शेख गफूर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्यावर गुन्हा दाखल होताच ते फरार झाले आहे
लहान भावाच्या आत्महत्येच्या धक्क्याने मोठ्या भावाचा मृत्यू
आत्महत्या केलेले शेतकरी अशोक भुयार यांच्यावर अंत्यसंस्कार करुन घरी परतलेले त्यांचे मोठे भाऊ संजय यांचा त्याच रात्री ह्रद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. लहान भावाच्या आत्महत्येचा धक्का संजय भुयार यांना बसला आणि भावाच्या अंत्यसंस्कारावरुन परतल्यानंतर मंगळवार रात्री ९.१५ वाजता त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी दोन भावांचा मृत्यू झाल्याने भुयार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू भेट देण्याची शक्यता
शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यानावे पत्र लिहिले आहे. याप्रकरणी राज्यमंत्री कडू यांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकली नाही. मात्र 24 डिसेंबरला ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेण्याची शक्यता आहे.