अमरावती - अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील एका संत्रा उत्पादक शेतकऱ्याने त्याची संत्रा व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याने विष घेऊन आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्व चिठ्ठीत राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव लिहून आत्महत्या करत न्यायाची मागणी या शेतकऱ्यांने केली आहे. अशोक भुयार (वय ५०, रा. धनेगाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
दारू पाजून मारहाण
या शेतकऱ्याने आपल्या शेतीतील बगीचा एका व्यापाऱ्याला विकला होता. मात्र सदर शेतकरी शेतात व्यापाऱ्याला पैसे मागण्यास गेला असता, शेतकऱ्याला दारू पाजून मारहाण केली, असे शेतकऱ्याने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. तर या घटनेची तक्रार अंजनगाव पोलीस ठाण्यात देण्यासाठी ते गेले असता त्यांना ठाणेदार व बीट जमादाराणेदेखील बेदम मारहाण केली, असेही त्यांनी आत्महत्यापूर्व चिठ्ठीत लिहिले आहे.
गावकऱ्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
सदर शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहून न्यायाची मागणी केली आहे. या घटनेनंतर मात्र जिल्हात खळबळ उडाली आहे. तर यावेळी गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत ठाणेदार व बिट जमादार यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. मात्र मृत्यूनंतर या शेतकऱ्यांना बच्चू कडू न्याय देतील का, हा सवाल आता उपस्थित झाला आहे.