अमरावती - अमरावती शहरात मागील काही दिवसांपासून कोरोणाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी शहरात संचारबंदी सुरू केली आहे. त्यामुळे, शहरातील अभ्यासिका, वाचनालयसुद्धा बंद करण्यात आले आहेत. यामुळे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या अडचणीत आले आहेत. त्यामुळे, राज्यभरातील अभ्यासिका चालू असताना अमरावतीमधील अभ्यासिका बंद का केल्या, असा प्रश्न स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आज केला.
विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन अभ्यासिका सुरू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे केली. पुढील महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने आम्ही घरी राहून अभ्यास कसा करायचा. जिल्ह्यात मंदिरे, मद्यालय, हॉटेल सुरू झाले. पण, आमच्या अभ्यासिका का बंद केल्या, असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे.
हेही वाचा - वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य, फास्टॅग नसलेल्या वाहनांना भरावा लागणार दुप्पट टोल
आधीच कोरोनामुळे काही महिने अभ्यासिका बंद होत्या. त्यात आता कशा तरी त्या सुरू झाल्या. परंतु, आता पुन्हा त्या बंद करण्यात आल्याने आमचे नुकसान होत आहे. सर्व गोष्टी चालू असताना मग अभ्यासिका बंद का. आमचे नुकसान होत आहे. त्यामुळे, अभ्यासिका सुरू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
घरी अभ्यास कसा होणार
दोन दिवसांपूर्वी संचारबंदीमुळे आमच्या अभ्यासिका बंद करण्यात आल्या. त्यामुळे, आम्ही घरी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. पण, ते शक्य झाले नाही. परीक्षा जवळ येत असल्याने अभ्यास करणे गरजेचे आहे. परंतु, आमचा अभ्यास होत नाही. फक्त अमरावती जिल्ह्यातील अभ्यासिका बंद आहेत. त्यामुळे, इतर जिल्ह्यातील विद्यार्थी पुढे जात आहे. ही भावना आमच्या मनामध्ये येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
हेही वाचा - अमरावतीत सोमवारी आढळले 449 नवे कोरोनाबाधित, 4 जणांचा मृत्यू