अमरावती- शेतकऱ्यांना या हंगामात विविध संकटाचा सामना करावा लागला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात सोयाबीन पिकावर आणखी एक संकट आले आहे. अगोदर पेरणी केलेले सोयाबीनचे बियाण्याची उगवण झाली नाही. जे सोयाबीन उगवले त्याच्यावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. आज मोर्शी तालुक्यातील लाडकी या गावात माजी कृषी मंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी सोयाबीन पिकाची पाहणी केली. बोंडे यांनी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
अमरावती विभागात सोयाबीन न उगवल्याच्या 30 हजारांच्यावर तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र, त्यावेळी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. आता सोयाबीन पिकाचे खोडकीड या नावाच्या किड्याने नुकसान केले आहे. हा किडा मुळापासून जाणारा रस शोषून घेतो यामुळे पिकांना शेंगा येत नाहीत. खोडकिड्याच्या प्रादुर्भावामुळे पिकाची पाने पिवळी पडतात व त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.
शेतकऱ्यांवर ओढावलेल्य संकटाच्या काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. या पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.