अमरावती - कोविड रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर अतिदक्षता विभागात रात्री 8 ते 2 वाजेपर्यंत माझी ड्युटी होती. रात्रीची ड्युटी म्हणजे झोपेला मारणारी ड्युटी. त्या दहा दिवसात मी झोपलीच नाही. इतर कुठल्याही गोष्टीला मुभा नव्हती. अतिदक्षता विभागात असल्यामुळे कोरोना रुग्णांना किती यातना होतात, हे डोळ्यादेखत अनुभवले, असे तब्बल २८ दिवसांनी घरी परतलेल्या परिचारिका सुनीती यांनी सांगितले.
सुनीती यांनी कोविड रुग्णालयात १४ दिवस रुग्णसेवा केली. त्यानंतर १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर २५ व्या दिवशी गणेश विहार परिसरातील आपल्या घरी परतल्या. यावेळी परिसरातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. फुलांची उधळण करण्यात आली. महिनाभराने घरी परतलेल्या सुनीती यांना पाहून त्यांची 5 वर्षांची चिमुकली गायत्री आणि 11 वर्षाच्या आर्यला गहिवरून आले. यावेळी सर्वजण अगदी भावूक झाले होते. आपल्या 24 दिवसांचा अनुभव सुनीती यांनी शेअर केला.
सुनीती सुशील हरणे, या १६ वर्षांपूर्वी स्टाफ नर्स म्हणून वैद्यकीय सेवेत रुजू झाल्या. त्यांनी त्यावेळी कर्तव्य पार पाडण्याची जी शपथ घेतली होती ती कोरोना रुग्णांच्या सेवेच्या माध्यमातून सार्थ ठरली, असे त्यांनी सांगितले. २८ दिवसानंतर घरी परतणाऱ्या सुनीती यांच्या स्वागतासाठी त्यांच्या घरातील सर्व सदस्यांसह प्रभागाचे नगरसेवक तुषार भारतीय आणि शेजारचे छोटे, मोठे सारे उपस्थित होते. आईला पाहून गायत्रीचे डोळे पाणावले. मात्र, आपण आज खरोखर मोठे कार्य करून घरी परतलो याचा अभिमान सुनीती यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
कोरोनाच्या काळात कुटुंबीयांचा आधार -
कोरोना रुग्णांची सेवा करताना कुटुंबीयांचा खूप मोठा आधार होता. माझी पाच वर्षांची मुलगी, 11 वर्षाचा मुलगा यांची काळजी माझ्या सासू-सासऱ्यांसह जाऊ या सर्वांनी घेतली. असे असले तरी मुलांना सोडून जाणे कठीण होते. पण, या काळात आमच्या सर्व टीमने प्रामाणिक काम केले. एक मात्र सांगावसं वाटत की ज्या दिवशी कर्तव्यावर गेली, त्या दिवशी रस्त्यावरची गर्दी पाहून खूप वाईट वाटले. रुग्णालयातील सर्व स्टाफ, डॉक्टर, पोलीस सर्वजण या परिस्थितीचा सामना करत असताना जनता आम्हा सर्वांना किती सहकार्य करते आहे, असा प्रश्न पडतो. जनतेने विचार करावा. लॉकडाऊनचे काटेकोर पालन करावे, असा सल्लाही सुनीती यांनी दिला.