अमरावती - आषाढी एकादशीनिमित्त नवीन अमरावती रेल्वे स्थानकावरून आज पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाडी निघाली. खासदार नवनीत राणा यांनी पंढरपूरला निघालेल्या सर्व भाविकांची गाडीच्या प्रत्येक बोगीत जाऊन भेट घेतली. त्यानंतर गाडीला हिरवा झेंडा दाखवून गाडीला रवाना केले.
'जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल' असा नाद आज सकाळपासून नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर सुरू होता. दुपारी अडीच वाजता गाडी सुटायची वेळ असताना १२ वाजेपासून भाविकांची गर्दी झाली होती. युवास्वाभिमान पक्षासह भाजप आणि शिवसेनेच्यावतीने भाविकांना रेल्वेस्थानकावर प्रसादाचे वितरण करण्यात आले. खासदार नवनीत राणा यांनी रेल्वे स्थानकावर पांडुरंगाची पूजा, आरती केल्यावर गाडीच्या प्रत्येक बोगीत जाऊन पंढरपूरला निघालेल्या भाविकांची भेट घेतली. यावेळी वृद्ध भाविकांच्या गळ्यात हार टाकून खासदार नवनीत राणा यांनी त्यांना नमस्कार केला. त्यानंतर काही वेळात आमदार रवी राणा हे सुद्धा नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचले.
खासदार नवनीत राणा यांनी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रेल्वेगाडीच्या चालकाचा सत्कार करून गाडीला हिरवा झेंडा दाखवला. तसेच गाडीच्या इंजीनवर भाजप, शिवसेना आणि युवस्वाभिमानचे फलक लावले होते. ते बघून आमदार राणा यांनी ही भाजप, सेना आणि युवास्वाभिमान आघाडीची स्पेशल ट्रेन असल्याचे म्हणाले. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ निर्माण झाला होता.