अमरावती Soler Project Get Stuck : अमरावतीच्या मेळघाटात चिखलदरा तालुक्यातील डोंगराच्या उंच टोकावर वसलेल्या माखला गावाचाच एक भाग असणाऱ्या टेंभुर्णी ढाणा या परिसरात 22 ऑक्टोबर 2021 ला 37.8 किलो वॅट क्षमतेचा सौर विकेंद्रीकरण सूक्ष्म पारेषण प्रकल्प कार्यान्वित झाला. यामुळं दिवसभर पुरेशी वीज उपलब्ध झाल्यामुळं 120 कुटुंबांनी घरात टीव्ही आणला, फॅन बसवले, कधी नव्हे ती चक्की गावात सुरू झाली. मात्र आता गेल्या सात महिन्यांपासून हा प्रकल्प ठप्प पडलाय. यामुळं या आदिवासी गावातील 'ऊर्जा'च निघून गेलीय. हा बंद पडलेला प्रकल्प पुन्हा कधी सुरू होणार असा प्रश्न या गावातील आदिवासी बांधव विचारत असले तरी त्यांच्या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर मात्र मिळत नाही. या गावातील नेमक्या परिस्थितीचा आढावा 'ईटीव्ही' भारत' नं जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, पुन्हा गावात वीज आणा इतकीच अपेक्षा या गावातील आदिवासी बांधवांची असल्याचं लक्षात आलंय.
कसा आहे सौर प्रकल्प : चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या माखला या गावाचा दुसरा भाग म्हणजे टेंभुर्णी ढाणा होय. या टेंभुर्णी ठाणा परिसरात 22 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अंतर्गत हा विकेंद्रित सूक्ष्मपारेषण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला होता. या सौर ऊर्जा प्रकल्पाची किंमत 69 लाख 9 हजार रुपये असून यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीच्या वतीनं आर्थिक सहाय्य करण्यात आलंय. टेंभुर्णी ढाणा परिसरातील एकूण 120 कुटुंबांच्या घरात सौर ऊर्जेमुळं वीज मिळाली. गावातील अनेक घरांमध्ये वीज आल्यामुळं गावातील युवकांना डोंगराखाली दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सेमाडोह इथं आपला मोबाईल फोन रिचार्ज करायला जाण्याची अडचण देखील दूर झाली. यामुळं अनेक घरांमध्ये टीव्ही आलेत. गावातील विद्यार्थी रात्री देखील अभ्यास करायला लागले अशी माहिती या सौर ऊर्जा प्रकल्पाचे गावातील व्यवस्थापक रामेश्वर जामुनकरांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
सौरऊर्जा प्रकल्पासाठी गावातील शेतकऱ्यांनी दिली जमीन : मेळघाटातील अतिदुर्गम गावांमध्ये सौर ऊर्जेद्वारे वीज देण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीनं करण्यात आलाय. या सौरऊर्जेद्वारे घरात एक छोटासा लाईट लागू शकतो तसंच फॅन कसाबसा चालतो. माखला येथील हा सौर ऊर्जा प्रकल्प 37.8 किलो वॅट क्षमतेचा आहे. गावकऱ्यांना वीज मिळेल यासाठी गावातील मानसिंग मोती अखंडी या शेतकऱ्यानं आपली शेत जमीन या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी दान दिली असल्याचं देखील रामेश्वर जामूनकर यांनी सांगितलं. ज्यांच्या घरात ही वीज पोहोचली त्यांना महिन्याला 60 रुपये द्यावे लागतात. या सौर ऊर्जा प्रकल्पात एकूण दोन जण गावात काम करत असून सौर ऊर्जा संदर्भात ग्रामस्थांच्या अडचणी सोडवणं तसंच प्रकल्पाची साफसफाई करणं अशी कामं हे दोन जण करतात असं रामेश्वर जामूनकर म्हणाले.
वीज पुरवठा बंद झाल्यानं ग्रामस्थ हैराण : सौरऊर्जाच्या आदर्श प्रकल्पामुळं माखला गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. सेमाडोह किंवा परतवाडाला असणाऱ्या चक्कीत दळण दळायला जाण्याचा त्रास वाचला. सारं काही सुरळीत सुरू असताना 10 जुलै 2022 पासून या प्रकल्पाद्वारे वीज पुरवठा अचानक बंद झाला. घरात आलेली वीज अचानक बंद पडल्यामुळं ग्रामस्थ हैराण झाले. दिवाळीपूर्वी प्रकल्प पुन्हा सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र आमची दिवाळी देखील अंधारात गेल्याची माहिती गावातील रहिवासी सखाराम जिलाटी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. गावात दळण्यासाठी घेतलेल्या दोन चक्की देखील बराच काळ बंद होत्या. सौर उर्जेवर चालणाऱ्या चक्की आता डिझेलवर चालवाव्या लागत असल्याचं शांती दिकार या 'ईटीव्ही भारत'शी' बोलताना म्हणाल्या. रात्री मुलं अभ्यासाला बसायची. मात्र आता रात्री अंधार असल्यामुळं मुलांचं अभ्यासातून देखील लक्ष उडाल्याची खंत शांती दिकार यांनी व्यक्त केलीय.
प्रकल्प बंद असल्याचं कारण काय : माखला या गावापासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रेट्याखेडा या गावात खांबावर लावलेल्या सौरऊर्जेच्या बॅटरीमुळं विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा जुलै महिन्यात मृत्यू झाला होता. या घटनेमुळं महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणानं चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या रायपूर ग्रामपंचायती अंतर्गत रेहट्याखेडा, धारणी तालुक्यातील चौराकुंड ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या चोपान यासह माखला येथील टेंभुर्णी ढाणा येथील सौर मायक्रोग्रीड प्रकल्प बंद केले आहेत. आमच्या गावापासून दूर कुठेतरी घटना घडली आणि त्यामुळं आमच्यावर अन्याय होत असल्याचा रोष माखला येथील ग्रामस्थांनी व्यक्त केलाय.
सेफ्टी ऑडिट होईपर्यंत प्रकल्प बंद : रेट्याखेडा या ठिकाणी घडलेल्या घटनेनंतर रेट्याखेडा, माखला आणि चौपान येथील सौर मायक्रोग्रीड प्रकल्पांचं ऑडिट केलं जाणार आहे. या प्रकल्पासंदर्भात सेफ्टी ऑडिट अहवाल येईपर्यंत हे प्रकल्प बंद ठेवण्यात आले आहेत. सुरक्षा नियमांचं कोणीही उल्लंघन करु नये, असं महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा :