अमरावती - पोटाची भूक भागवण्यासाठी कोणाच्याही घरून शिळ्या अन्नाची भीक मागितली. शिक्षणासाठी दोन पैशांची मदत होईल म्हणून सायंकाळी गावठी दारूही विकली. संपूर्ण बालपण शिक्षणासाठी धडपड करण्यात गेले. अन् आता बेड्यावरच्या निकिता पदव्युत्तर पदवी मिळवून सुशिक्षित झाल्या आहेत. गावभर भटकणाऱ्या आणि आपला बेडा हेच जग म्हणून जगणाऱ्यांसाठी निकिता पवार या आदर्श ठरत ( Amravati Nikita Pawar ) आहे. महिला दिनाच्या निमित्ताने निकिता पवार यांचा संघर्ष त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला ( Nikita Pawar Struggle ) आहे.
निकिता पवार म्हणाल्या की, तुम्ही लोकं चोर आहात, अशा शब्दांत आमच्या समाजाला हिणवण्यात येते. हे चित्र मला बदलायचे आहे. म्हणून समाजातील नवी पिढी शिक्षित व्हावी यासाठी माझी धडपड सुरु आहे.
निकिता पवार यांनी अमरावतीतील होलीक्रॉस प्राथमिक शाळेत कलाशिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. तिवसा येथील ज्ञानमाता शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत समतादूत तसेच, छत्रपती शिवाजी महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेत तारादूत म्हणूनही निकिता यांनी कार्य केले. मात्र, आता निराधार फासेपारधी विकास संस्थेच्या माध्यमातून बेड्यावरील लोकांमध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जनजागृती व्हावी, यासाठी निकिता यांचे प्रयत्न सुरु आहेत. मेळघाटातील अनेक गावांमध्ये आदिवासी महिलांचे बचत गट सुरू केले आहेत. मेळघाटातील आदिवासींनाही आर्थिक दृष्ट्या बळकट होण्यासाठी होईल ती मदत मी माझ्या संस्थेद्वारे करीत असल्याचे निकिता पवार यांनी म्हटले.
अन् पाच रुपये ग्लास प्रमाणे दारु विकली
आम्ही सहा भावंड होतो. वडील शिकारीचे काम करायचे. आईला मात्र शिक्षणाची आवड होती. त्यामुळे आपल्या मुलांनी शाळेत जावे, अशी तिची इच्छा होती. मला होलीक्रॉस शाळेत टाकण्यात आले. त्या ठिकाणीच वसतिगृहात राहायचे. सुट्टीला घरी येईल तेव्हा अन्य मुलांसोबत भीक मागायला जायचे. एखाद्या लग्नसोहळ्यात उरलेले अन्न सुद्धा मी उचलून खाल्ले आहे. त्या ठिकाणी शाळेतल्या अन्य मुली दिसल्या की वाईट वाटायचे. मात्र, परिस्थितीच तशी होती. आमच्यावर कोणीही विश्वास ठेवत नसल्याने काम मिळत नसे. त्यामुळे मी स्वतः पाच रुपये ग्लास प्रमाणे गावठी दारू विकून शिक्षणासाठी कामी येईल म्हणून पैसे गोळा केले. वयाच्या पंधराव्या, सोळाव्या वर्षात घरचे लग्न करुन देतील, म्हणून अनेकदा घरातून पळून गेल्याचेही निकिता पवार यांनी म्हटले आहे.
आंतरजातीय विवाहातून मिळाले बळ
पुढे निकिता पवार यांनी सांगितले की, सात वर्षापूर्वी मी प्रेम विवाह केला आहे. माझे पती ब्राम्हण आहेत. आमच्या दोन्ही कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. मात्र, लग्नानंतर सर्वांनी आम्हाला समजून घेतले. सासरच्या मंडळींनी माझ्या समाजकार्याला प्रोत्साहन दिले. माझे पती जयेश राजे हे एका खाजगी कंपनीत काम करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीची बंधने तोडा असा संदेश दिला होता. तो संदेश खरोखर मला बळ देणार ठरला. आंतरजातीय विवाहामुळे मी आमच्या समाजासाठी लढण्यास आणि समाजाला इतर समाजाप्रमाणेच प्रतिष्ठा मिळावी. यासाठी बळकट झाली असून, समाजाचे चित्र बदलवण्याचे माझे प्रयत्न असल्याचा विश्वास निकिता पवार यांनी व्यक्त केला आहे.