अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध असताना केवळ मूठभर लोकांच्या स्वार्थामुळे संपूर्ण परीक्षा यंत्रणा खासगी कंपनीच्या माध्यमातून राबविण्याच्या नादात विद्यापीठाने आपली प्रतिष्ठा गमावली असल्याचा रोष सिनेट सदस्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केला आहे. सलग पाच वेळा परीक्षा रद्द झाल्याने कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि केंद्रीय मूल्यांकन मंडळ संचालकांच्या कार्य प्रणालीविरोधात विद्यार्थी आणि पालकांसह सिनेट सदस्य आणि अनेक महाविद्यालयांच्या प्रचार्यांमध्ये रोष उफाळून आला आहे.
हेही वाचा - मुंबई पोलीस एखाद्या तपासाच्या मुळाशी गेले की, 'ते' राज्यात घुसतात!
ऑनलाईन परीक्षा घेण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या विद्यापीठाच्या कार्यप्रणालीवर भाष्य करताना संत गाजनाब अमरावती युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनचे प्रमुख आणि सिनेट सदस्य असणारे प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांनी पाच वेळा परीक्षा रद्द केली जाते हे विद्यापीठाचे दुर्दैव आहे. नागपूर विद्यापीठाचा प्रभार मिळाला म्हणून अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर हे सलग चार महिने नागपूरला असल्याने आपल्या विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी प्र- कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांच्याकडे होती. मात्र, ही जबाबदारी पेलण्यास प्र- कुलगुरू अपयशी ठरलेत. खरंतर परीक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोग आणि सर्वोच्च न्यायलायने दिलेल्या गाईडलाईन्स दुर्दैवाने आपल्या कुलगुरूंना कळत नाहीत.
कुठल्याही अधिकाऱ्याला वाचता येत नाही. केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची असताना पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे जे विषय राहिलेत त्याचीही परीक्षा घेतली जात आहे. कुलगुरू आपल्या भोवताली बाजार बुंडगे जमा करून आपल्या जवळच्या कंपनीला फायदा व्हावा यासाठी यशस्वी होऊ न शकणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचा हट्टाहास करीत आहे. खरंतर सर्व प्राचार्यांना आपल्या स्तरावर महाविद्यालयात परीक्षा घेऊ दिली तर 15 दिवसात ही परीक्षा सहज घेतली जाऊ शकते. मात्र केवळ एका कंपनीच्या हितासाठी जे काही सुरू आहे ते दुर्दैवी असल्याचेही डॉ. संतोष ठाकरे म्हणाले.
नागपूरच्या प्रोमार्क कंपनीकडे आपल्या विद्यापीठाने कारण नसताना परीक्षेची जबाबदारी दिली आहे. खरतर नागपूरला भाड्याच्या दोन खोलीत असणाऱ्या या कंपनीकडे स्वतःचे सर्व्हर नाही. त्यांनी हेैदराबादच्या एका कंपनीकडून सर्व्हर उधार घेतले. अशा या फालतू कंपनीच्या नादाला लागून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, पदवी हे सर्व महत्वाचे दस्तऐवज या अशा कंपनीच्या माध्यमातूनन नागपूर आणि हेैदराबादला पोचणे हे गंभीर असल्याचे नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन अध्यक्ष आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी यांचे म्हणणे आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक आणि विद्यामान सिनेट सदस्य डॉ. बी. आर. वाघमारे यांनी पूर्व परीक्षा, परीक्षा आणि परीक्षेनंतरची गुणपत्रिका आणि पदवी देण्याच्या कामासंदर्भात संपूर्ण अद्यावत व्यवस्था पूर्वी विद्यापीठात होती. आता ती व्यवस्था उध्वस्त करून ज्यांची कुठलीही विश्वासअर्हता नाही अशा कांनीला परीक्षेची जबाबदारी देणे दुर्दैवी आहे. विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, पदवी या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जात असतात त्याबाबत गांभीर्य बाळगणे अत्यंत गरजेचे असताना हे असं होतं नसल्याबाबतची खंतही डॉ. बी.आर. वाघमारे यांनी व्यक्त केली.
.
एकूणच विद्यापीठ हे विद्यार्थी हितापेक्षा क्षुल्लक अशा कंपनीचे हित जोपासण्याचा प्रयत्न करीत असल्याने परीक्षेचा बोऱ्या वाजला असून विद्यार्थ्यांचा छळ केला जात आहे.