अमरावती: व्यावसायिक शिक्षणाचे धडे फक्त पुस्तकातून न गिरवता, त्या शिक्षणाचा प्रत्यक्ष व्यवहारात काय आणि कसा उपयोग करता येऊ शकतो. अमरावतीच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक कन्या शाळेने एका आगळ्या वेगळ्या प्रयोगातुन हे करून दाखवले आहे.
संकल्पनेतून उभे राहिले स्टोअर: इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात रिटेल मॅनेजमेंट हा विषय आहे. १०० गुणांचा हा विषय असून ७० गुणांचे प्रात्यक्षिक तर ३० गुणांची थियरी आहे. रिटेल मॅनेजमेंट हा विषय निव्वळ शिकवण्यापुरता न ठेवता त्या विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना दिल्या गेले पाहिजे. विद्यार्थ्यांना जीवनात खऱ्या अंगाने व्यावसायिक कौशल्य विकसित होऊन त्यांना व्यावहारिक ज्ञान द्यावे, या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद काळमेघ यांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी डिपार्टमेंटल स्टोअर सुरू करावे, अशी संकल्पना मांडली. शाळा व्यवस्थापन समितीने सुद्धा या संकल्पनेला लगेच होकार दिला. शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवसाय शिक्षक मंगेश मानकर यांच्या संकल्पनेतून हे डिपार्टमेंटल स्टोअर सूरू झाले.
प्रजासत्ताक दिनी झाले स्टोअरचे उद्घाटन: शाळेतील दिव्यांग विद्यार्थिनी वांशिका देशमुख हिच्या हस्ते 26 जानेवारी 2023 रोजी या स्टोअरचे उद्घाटन पार पडले. इयत्ता नववीच्या 40 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी शंभर रुपये याप्रमाणे यामध्ये गुंतवणूक केली. तर काही पैसे शिक्षकांनी यामध्ये गुंतवले आहेत. गेल्या दीड महिन्यात १८ हजार रुपयांचा व्यवसाय झाला. आतापर्यंत २३०० रुपयांचा नफा तर २४ हजार रुपयांचा स्टॉक शिल्लक आहे. रिटेल मॅनेजमेंटच्या भागीदार विद्यार्थिनींना कमाईचे समान वाटप वर्षाअंती केले जाणार आहे.
विद्यार्थिनी गिरवतात प्रत्यक्ष व्यवसायाचे धडे: शाळेची मधली सुट्टी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जीव की प्राण असते. ही सुट्टी केवळ डबा खाण्यापुरतीच मर्यादित नसते तर, कुणाचा पेन संपला, बुक खरेदी करायचे आहे, चिप्स, चॉकलेट, बिस्कीट खरेदी करणे अशी कामे विद्यार्थी या मधल्या सुटीच्या वेळेत करतात. पण त्यासाठी त्यांना शाळेच्या आवाराबाहेर धाव घ्यावी लागते. अश्यावेळी त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न पडतो. शाळेच्या माध्यमातून शिकवण्यात येणाऱ्या रिटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक अभ्यासक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना स्वयंरोजगार व व्यवसायाविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने, शालेय उपयोगी वस्तू व खाद्य पदार्थ विक्री प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद काळमेघ यांनी दिली.
विद्यार्थ्यांना काय शिकायला मिळते : जिल्हा परिषद मुलींच्या शाळेचा हा उपक्रम अनुकरणीय आहे. यामुळे विद्यार्थिंनीचे मधल्या सुट्टीत शाळेबाहेर जाणे बंद झाले आहे. तसेच बाहेरील निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थां पासून दूर राहणे यासह त्यांना दुकानासाठी लागणाऱ्या मालाची ठोक खरेदी, विक्री, मालाचे व्यवस्थापन, बिलिंग प्रकिया, ग्राहकांच्या गरजा, व्यावसायिक संवाद कौशल्य, आथिर्क व्यवहार अशा दैनंदिन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींचा व्यक्तिमत्व व व्यावसायिक विकास होत आहे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. रिटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक अभ्यासक्रमा अंतर्गत शालेय उपयोगी वस्तू व खाद्य पदार्थ विक्री प्रकल्पाने विद्यार्थ्यांची मात्र शाळेतच चांगली सोय झाली आहे.
स्टोअरमध्ये काय मिळते: पारले, हल्दीराम, बिंगो, कॅडबरी, बालाजी, डायमंड, गोपाल, लेझ, कुरकुरे व पेन, पेन्सिल, बुक, खोडरबर, कँपास अश्या शालेय उपयोगी साहित्यांची अधिकृत एजेन्सीकडून खरेदी केल्या जातात. शाळेतूनच संबन्धित ऑर्डर देऊन जागेवरच माल बोलावल्या जातो, अशी माहिती या स्टोअरच्या संचालक विद्यार्थीनींनी दिली. या उपक्रमाची संकल्पना व प्रभावी अंबलबजावणी शाळेचे व्यवसाय शिक्षण विभागाचे प्रमुख मंगेश मानकर यांनी प्रत्यक्षात उतरविली. हा उपक्रम समग्र शिक्षा विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या व्यवसाय शिक्षण योजनेतून सुरू करण्यात आला आहे.