अमरावती - आपली पुढची पिढी स्वाभिमानी व्हावी, असे वाटत असेल तर आजच्या पिता-पुत्रांसमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श असायला हवा, असे शिवचरित्रकार शिवरत्न शेटे यांनी म्हटले आहे. शिवजयंती निमित्त येथील विद्याभारती महाविद्यालयाच्या मैदानावर, 'शिवशंभू पितापुत्रांतील अविस्मरणीय भावबंध' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शेटे म्हणाले, संभाजी महाराजांबद्दल अनेक अपप्रचार करण्यात आले. वास्तवात संभाजी महाराज आपल्या वडिलांसारखेच सरस राजे होते. संभाजी आणि शिवाजी महाराज यांच्यात खटके उडल्याचा आणि संभाजी महाराजांना पदोपदी चुकीचे ठरविण्याचा उद्योग चिटणीस बखरीत केला गेला. ही बखर संभाजी महाराजांनंतर शंभर वर्षांनी लिहिली गेली. त्यामुळे यात तथ्य नाही. मात्र, संभाजी महाराजांच्या हयातीत लिहीण्यात आलेल्या अनुपुराणमध्ये संभाजी महाराजांच्या मूळ जीवनाचा उल्लेख आहे, असे शिवरत्न शेटे म्हणाले.
संभाजी महाराज दिलेरखानाला जाऊन मिळाले या मागे केवळ प्रमाद होता चूक नाही, असेही शेटे यांनी सांगितले. फ्रेंच प्रवासी आबे कार्ट याने संभाजी आणि शिवाजी महाराजांचे अतिशय चांगले संबंध होते, संभाजीराजे राजबिंडे आणि देखणे होते, असा उल्लेख केला असल्याचेही शिवरत्न शेटे म्हणाले. यावेळी शेटे यांनी संभाजी महाराजांचा धगधगता जीवनपट श्रोत्यांसमोर मांडला.
व्याख्यानाला अमरावतीकरांची गर्दी उसळली होती. व्याख्यानापूर्वी पुलवामा येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी राज्यमंत्री डॉ. श्रीकांत देशपांडे, आमदार बच्चू कडू, महापालिकेचे विरोधीपक्ष नेता बबलू शेखावत, माजी महामौर विलास इंगोले आदी उपस्थित होते.