अमरावती - पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात शिवसेनेने शुक्रवारी मोर्चा काढून केंद्र शासनाचा निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा धडकल्यावर शिवसैनिकांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
मोदी सरकारने वाढवली महागाई -
पेट्रोल आणि गॅस सिलिंडचे दर कमी करणार अशा थापा मारत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेत. आज पेट्रोल आणि गॅस सिलिंडरचे दर प्रचंड वाढले असताना निवडणूक प्रचारादरम्यान थापा माराव्या लागतात असे भाजपचे नेते म्हणत आहेत. भाजपची भूमिका ही सर्व सामांन्यांचे आर्थिक शोषण करणारी आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.
सायकल आणि रिक्षांचाही मोर्चा -
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे आणि प्रवीण हरमकर यांच्या नेतृत्वात शीवसैनिक इर्विन चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी चालत पोहोचले. पक्षाचे तिसरे जिल्हा प्रमुख राजेश वानखडे आणि शहर प्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात राजकमल चौक येथून शिवसैनिल सायकलवर स्वार होऊन तर महिला पदाधिकारी सायकल रिक्षात स्वार होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
पोलिसांना कडेकोट बंदोबस्त -
शिवसैनिकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असता पोलिसांना कडेकोट बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होता. शिवसैनिकांनी अर्धा तास घोषणा दिल्यावर मोर्चा विसर्जीत करण्यात आला.
या शिवसैनिकांचा होता सहभाग -
सुनील खराटे, प्रवीण हरमकर, राजेश वानखडे, रेखा खरोडे, मनीषा टेंबरे, मंजुषा जाधव, वर्षा भोयर आदी आंदोलनात सहभागी होते.