अमरावती - तालुक्यातील शेतीसाठीचे पाणंद रस्ते त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी सातबारा शेतकरी पाणंद रस्ता कृती समितीने तहसील कार्यालयात चक्क बैलजोडी आणून आंदोलन केले. तसेच महिंद्रा फायनान्सकडून गुंडांमार्फत सुरू असणाऱ्या कर्ज वसुलीचा निषेध यावेळी करण्यात आला.
हेही वाचा - अमरावती: तिवसा पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा; सहाही उमेदवारांचा दणदणीत विजयी
पाणंद रस्ते हे शेतमजुरांसाठी जीव की प्राण असून यावर्षी अतिपावसामुळे पाणंद रस्ते झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पालकमंत्री पाणंद विकास रस्ता योजनेचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला. ग्रामपंचायतकडून पाणंद रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव मागवण्यात आले. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झाली नाही. जवळपास 158 रस्त्यांचा प्रस्ताव गेल्या ३ वर्षांपासून उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयात धूळखात पडत असल्याचा आरोप शेतकरी पाणंद रस्ता कृती समितीचे प्रमुख प्रकाश साबळे यांनी केला.
यासंदर्भात सतत पाठपुरावा करूनही उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व विभागांनी दुर्लक्ष केल्याचे वास्तविक चित्र आहे. औद्योगीकरणासाठी पक्के रस्ते करत असताना कृषी उद्योगाची प्रगती होण्यासाठी किमान शेतीसाठी कच्चे रस्ते करणे गरजेचे आहे. मात्र, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कित्येक पाणंद रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. यासोबतच महिंद्रा फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्यांना दिलेले कर्ज वसुली करण्यासाठी गुंडाची मदत घेतली जात असल्याचा आरोपही प्रकाश साबळे यांनी केला.
शेतकऱ्यांच्या या व्यथेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी पाणंद रस्ता कृती समितीच्यावतीने चक्क बैलजोड्या तहसील कार्यालयात आणण्यात आल्या. या आंदोलनानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.
या आंदोलनात प्रकाश साबळे यांच्यासह समितीचे राजेंद्र उमेकर, राजेश अंबेकर, राजू कुंड, सचिन आढाव, वैभव डावरे, सूर्यभान पारिसे आदी सहभागी झाले होते.