अमरावती - राज्यात आज मोठ्या प्रमाणात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाते. आज प्रशासकीय कार्यालयाला सुट्टी असली तरी पंचायत समिती तिवसा येथे महिला बालकल्याण विभाग, तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प विभागामार्फत सावित्रीबाई फुले जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
हेही वाचा - गुरुकुंज मोझरी येथून अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना
अंगणवाडी सेविकांनी लहान चिमुकल्यांना ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत हा उत्सव साजरा करण्यात आला. 'उत्सव सावित्रीचा जागर स्त्रीशक्तीचा' ही संकल्पना ठेवून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत सकाळी स्त्री शिक्षण विषयी जागृकता निर्माण व्हावी म्हणून सावित्री दिंडीचे आयोजन करण्यात आले. अंगणवाडीतील/गावातील लहान मुलींना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पेहराव करून स्त्री शिक्षणाचे आवाहन करण्यात आले.
नवजात मुलींच्या जन्माचे ठिकठिकाणी स्वागत
गावात नवजात मुलींच्या जन्माचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. कोविड १९ अंतर्गत उल्लेखनीय काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका/मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी, मातांमध्ये आहारा विषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी पोषण आहार संबंधी प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी मिनाक्षी भस्मे, विस्तार अधिकारी घोरमाडे उपस्थित होते. तसेच, प्रमुख म्हणून वरठी मॅडम, विना नाईक, विजया मानकर, कु. समरी सोनोने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संचालन रोहिणी टेकाडे, तर आभार प्रदर्शन विना नाईक यांनी केले. तसेच, ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा अमोल गडलिंग, कार्तिक शापामोहन, वैभव मकेश्वर, कादंबरी वऱ्हाडे या चिमुकल्यांनी केली होती. यावेळी कोरोना योद्धा म्हणून आशासेविकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता पुष्पलता बुटले, मीना वऱ्हाडे वनमाला टिकले, सुनंदा गाडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तसेच मुलांचे पालक उपस्थित होते.
हेही वाचा - किसान सभेचे शेकडो शेतकरी दिल्लीच्या वाटेवर; आज मोझरीत होणार सभा