अमरावती - पाणी टंचाईचे भीषण चटके सहन करणाऱ्या अमरावतीकरांना भविष्यात पाणी मिळावे. तसेच उपलब्ध असलेले पाणी वाया न जाता जमिनीत झिरपावे या उद्देशाने आज सकाळी अकोली परिसरातील नवीन अमरावती रेल्वे स्थानक परिसरात शेकडो नागरिकांनी महाश्रमदान केले.
भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि अकोली प्रभागाचे नगरसेवक तुषार भारतीय यांच्या आवाहनाला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. आज सकाळी ६ वाजल्यापासून नवीन अमरावती रेल्वे स्थानक परिसरात महाश्रमदानाद्वारे शेकडो नागरिकांनी चर खोदले. ९ वाजेपर्यंत सुमारे १०० चर खोदण्यात आले. तसेच रविवारीसुद्धा या परिसरात सकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान महाश्रमदानातून आणखी चर खोदण्यात येणार आहेत. या उपक्रमात लहान मुलांसह युवक, युवती, पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिकही सहभागी झालेत. विविध सामाजिक संघटनाही या उपक्रमासाठी पुढे सरसावल्या आहेत.
अमरावती शहरवासीयांची तहान अप्पर वर्धा धरणात उरलेल्या अल्पशा पाणी साठ्यावर भागवली जात आहे. शहरातील वडाळी आणि छत्री तलाव हे कधी नव्हे ते कोरडे पडले आहेत. यापूर्वी अमरावती शहाराने पाण्याची इतकी भीषण टंचाई कधीही पहिलेली नाही. जमिनीत पाणी मुरत नसल्याने अशी गंभीर परिस्थिती ओढावली आहे. आज आणि उद्या श्रमदानाच्या माध्यमातून अकोली परिसरात पाणी मुरवण्यासाठी चर खोदण्यात येत आहेत. यानंतर शहरातील खुल्या भूखंडावरही असे चर खोदून जमिनीत पाणी मुरवण्याचा उपक्रम सातत्याने राबविला जाईल, असे नगरसेवक तुषार भारतीय 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.