अमरावती - कोरोना विषाणूचा संसर्ग अमरावती जिल्ह्यात वाढत असल्याने दवाखाने व मेडिकल वगळता बाजार समित्यासह, सर्व जीवनावश्यक वस्तूचे आस्थापने बंद ठेवण्यात आली होती. याचा फटका जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना बसत होता. कारण खरिप हंगाम काही दिवसांवर असताना मात्र बाजार समित्या बंद होत्या, त्यामुळे शेतमाल कुठे विकायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला होता. दरम्यान शेतकऱ्यांची गरज लक्षात घेत आता अमरावती जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या या नियम आखून सुरू करण्यास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी परवानगी दिल्यानंतर आता जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सुरू झाल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना मान्सून पूर्व दिलासा मिळाला आहे.
कोरोनाची नियमावली पाळणे गरजेचे
कोरोनाची नियमावली पाळून बाजार समितीमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन बाजार समितीत व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता टोकन पद्धतीने व्यवहार केले जात आहेत.
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दहा दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल हा घरीच पडून होता. परंतु ज्या शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज होती, अशा शेतकऱ्यांकडून काही व्यापार्यांनी कमी भावाने शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केल्याच्या घटनाही जिल्ह्यात समोर आल्या आहेत. त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसानदेखील झाले आहे.