अमरावती - एक आठवड्यापूर्वी संपूर्ण राज्यभर संततधार पाऊस होता. पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाती आलेलं सोयाबीन पीक अक्षरशः मातीमोल झालं आहे. पांढरं सोन म्हणून ज्याला शेतकरी मिरवतात त्या कापूस पिकालाही मोठा फटका बसला. मात्र, आता मागील पाच दिवसापासून पाऊस थांबला असल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला असला तरी त्याच्या समोरची संकटाची मालिका संपता संपत नाही आहे. शेतात उरले सुरले सोयाबीन शेतकरी काढण्याच्या तयारीत आहे. मात्र, शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्याची परिस्थिती पावसामुळे बिकट झाल्याने शेतातील शेतमाल काढून घरी कसा आणावा? असा प्रश्न शेतकऱ्यांना समोर उभा ठाकला आहे.
यंदा पावसाने धुमाकूळ घातल्याने बळीराजा हतबल झाला आहे. हजारो रुपये खर्च करून शेतात पिकांची लागवड केली. त्यात संततधार पावसामुळे हातातून पिके गेली. मात्र, उरलेसुरल्या पिकांवर शेतकऱ्यांची मदार होती. तर शेतात जाणारे वहवाटीचे पांदण रस्ते या पावसामुळे प्रचंड खराब झाले आहे. त्यात शासनाचे दुर्लक्ष यामुळे वाताहात झालेल्या या रस्त्यातून कुठलेच यंत्र, बैल बंडी, सोयाबीन काढणी यंत्र, ट्रॅक्टर अन्य वाहन शेतापर्यंत जात नसल्याने अमरावती जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात पडून आहे. जर योग्य वेळी सोयाबीनची काढणी झाली नाही तर उरल्यासुरल्या सोयाबीनच्या शेंगा ही आता फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा - महागाईचा विरोध : राष्ट्रवादीने गॅस सिलिंडरचे घातले श्राद्ध, वापरणार चुली
अमरावती शेतकरी रुपेश जोगे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्या तीन एकरवर त्यांनी यावर्षी सोयाबीनची लागवड केली आहे. पावसामुळे सोयाबीनला फटका बसला आहे. तरीही काही अंशी सोयाबीन हे शिल्लक आहे. हे काढण्यासाठी त्यांची मागील आठवड्यापासून धडपड सुरू आहे. मात्र, त्यांच्या शेतात जाणारा वहिवाटीचा पांदण रस्ता मात्र बारा वर्षापासून दुरुस्त झाला नसल्याचा आरोप रुपेश जोगे यांनी केला आहे. शेतात पीक काढणी यंत्र नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसामुळे पांदण रस्ता खराब झाल्याने शेतात कुठलाच यंत्र जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
कंत्राटदारांकडून केले जातात थातूरमातूर कामे -
शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे शासनाकडून कंत्राटदारांना दिली जाते. मात्र, कंत्राटदार थातूरमातूर कामे करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पांदण रस्त्याचे काम केल्यानंतर दोन तीन वर्षात पावसामुळे पांदण रस्त्यांची जैसे ते परिस्थिती होत असल्याने शेतात जाणेही अवघड होत आहे. त्यामुळे पांदण रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पश्चिम विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान
- बुलढाणा जिल्हा -
सोयाबीन-88 हजार 36 हेक्टर
कापूस-19 हजार 926 हेक्टर
- अकोला जिल्हा -
सोयाबीन-33 हजार 947 हेक्टर
कापूस-7 हजार 734 हेक्टर
- वाशिम जिल्हा -
सोयाबीन-33 हजार 250 हेक्टर
कपाशी-481 हेक्टर
- अमरावती जिल्हा -
सोयाबीन-83 हजार 393 हेक्टर
कापूस-66 हजार 952 हेक्टर
- यवतमाळ जिल्हा -
सोयाबीन-2676 हेक्टर
कापूस-6641 हेक्टर