अमरावती : महादेवाच्या पूजेमध्ये बेलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महादेवाच्या पिंडीवर १०८ बेलपत्र वाहिली जातात. महादेवाची पूजा करताना बेलाचे जितके महत्त्व आहे, तितकाच हा बेल आयुर्वेदिकदृष्ट्या देखील गुणकारी असतो. आयुर्वेदात महत्त्वाची वनस्पती म्हणून बेलाला मान आहे. विशेष म्हणजे, बेलाचे वृक्ष हे संपूर्ण भारतभर आढळतात.
बेलवृक्षासंबंधी दोन पौराणिक कथा : बेलवृक्षाचा उगम पृथ्वीवर नेमका कसा झाला या संदर्भात दोन पौराणिक कथा प्रचलित असल्याची माहिती वनस्पती शास्त्राच्या अभ्यासक डॉ. अर्चना मोहोड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. सूर्याचं तेज आणि प्रकाश पूर्णतः लुप्त झाल्यानंतर तो परत आणण्यासाठी देवांनी एक पांढरी शुभ्र गाय सूर्याला अर्पण केली. गाय अर्पण करताच सूर्याचा प्रकाश परत आला. त्या प्रकाशासोबत बेलाच्या झाडाचा उगम झाला, अशी एक पौराणिक कथा सांगितली जाते. यासह स्कंद पुराणानुसार, एकदा पार्वती फार थकली होती. तेव्हा तिच्या घामाचे थेंब मंदार पर्वतावर पडले. जिथं जिथं हे घामाचे थेंब पडले, त्या ठिकाणी बेलाच्या झाडाचा उगम झाला, असं म्हटलं जातं.
बेलवृक्षात पार्वतीचा वास : बेलाच्या वृक्षात पार्वतीचा वास असल्याचं म्हटलं जातं. पार्वतीचे पृथ्वीवर अनेक अवतार झालेत. त्या प्रत्येक अवताराचा समावेश बेलाच्या वृक्षामध्ये आहे. बेलाच्या मुळामध्ये गिरिजा, बेलाच्या बुंध्यामध्ये माहेश्वरी, फांद्यांमध्ये दुःखशैनी, फळ्यांमध्ये कात्यायनी, फुलांमध्ये गौरी आणि बेलाच्या पानांमध्ये पार्वतीचा वास आहे. बेलाच्या तीन पानांमध्ये रजस, तमस आणि सत्व हे तीन गुण असतात, अशी मान्यता असल्याचं डॉ. अर्चना मोहोड यांनी सांगितलं.
बेलावृक्षाचे औषधी गुण : बेलाच्या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदात उल्लेख असल्याप्रमाणे दशमुलारिष्टामध्ये बेलाच्या मुळाचा अर्क असतो. बेलाच्या पानाचा नियमित ज्यूस घेतला तर कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो. बेलाच्या फळातील गर तुपामध्ये भाजून खाल्ला तर हृदयाशी संबंधित कुठलेही आजार होत नाहीत. बेलाच्या रसामुळे त्वचा विकार होत नाहीत. तसेच केसांसाठी देखील तो फायदेशीर असतो, असं डॉ. अर्चना मोहोड यांनी सांगितलं.
बेलाची इतर वैशिष्ट्ये : बेलाच्या वृक्षाला कवठासारखी फळे येतात. ही फळे कोवळी असताना त्यांची भाजी केली जाते. तसेच त्याचं लोणचं देखील घालतात. पिकलेल्या बेल फळांची चव गुळचट असते. बेलाच्या झाडाची सावली अतिशय शीतल असते. ती आरोग्यदायक मानली जाते. तसंच अतिसार, आवरक्त, घशात जळजळणे, बहिरेपणा, सर्पदंश, मूळव्याध मलबद्धता, सूज येणे अशा विविध विकार आणि आजारांवर बेलाचे फळ, पान, साल, मुळं गुणकारी ठरतात.
हेही वाचा :