अमरावती - मागील एक ते दीड महिन्यापूर्वी चीनमध्ये आलेल्या कोरोना या जीवघेण्या विषाणूने आता जगभरातील ६० पेक्षा अधिक देशात पाय रोवला आहे. कोंबडीमुळे कोरोना विषाणू पसरतो या धादांत अफवेमुळे पोल्ट्री व्यवसायिकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या भीतीने चिकनची मागणी घटली असून त्याचे भावही घसरले आहे. जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक हे १० रुपये प्रति किलो जिवंत बॉयलर कोंबडी विकताना दिसून येत आहेत.
कोरोनामुळे जिवंत बॉयलर कोंबडीचा भाव १० रुपये किलो
मागील अनेक दिवसांपासून समाज माध्यमांवर कोंबडीमुळेच कोरोना विषाणूची लागण होते, अशा आशयाचे मॅसेज फिरत आहेत, त्याचा धसका चिकन खाणाऱ्या नागरिकांनी घेतला आहे. साधारणत: ८० ते ९० रुपये किलोला विकली जाणारी जिवंत बॉयलर कोंबडी आज १० रुपये किलोने विकण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. लाखोंची उलाढाल व्यावसायिकांनी या व्यवसायात केली आहे. परतुं, कोरोनामुळे मात्र कोंबडीला मागणी नसल्याने लाखोंच्या कोंबड्या शेडमध्ये पडून आहेत.
कोरोना संकटामुळे चिकन व्यावसायिकाला अश्रू अनावर
या परिस्थितीमुळे चिकन व्यवसायिकांवर संकट कोसळले आहे. इस्माईल शेख यांचे शहरात चिकन विक्रीचे दुकान आहे. मात्र, कोरोनाच्या अफवेमुळे लोकांनी चिकनपासून फारकत घेतली. त्यामुळे, इस्माईल यांचा धंदा डबघाईस आला आहे. या परिस्थितीमुळे गेल्या ४२ वर्षांपासून चिकन व्यवसाय करणारे इस्माईल शेख यांना आपल्या उदरनिर्वाहाची चिंता सतावत आहे. धंध्यात तोटा इतका की, परिस्थिती सांगताना त्यांना आपले अश्रू देखील अनावर झाले होते.
बहुतांश चिकन व्यावसायिक शेतकरी; कर्ज फेडण्याची चिंता
चिकनचा व्यवसाय करणारे बहुतांश व्यावसायिक हे शेतकरी आहेत. शेतीत तोटा जास्त आणि पिकाला बाजारभाव नाही, अशा परिस्थितीमुळे शेतकरी या व्यवसायाकडे वळतात. त्यासाठी शेतकरी बँकांकडून लाखो रुपयांचे कर्ज काढतात. परंतु, कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसायावर परिणाम झाला. धंध्यात मंदी आल्याने आता बँकांचे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. परिस्थितीला कंटाळून आत्महत्येसारखे अयोग्य पाऊल देखील उचलण्याचा विचार त्यांच्या मनात येत आहे.
कोरोनाचा अंडे व्यवसायावरही परिणाम
कोरोनाचा फटका पोल्ट्री, चिकन व्यवसायालाच बसला आहे असे नाही, तर अंडे व्यवसायावरही याचा मोठा प्रभाव झाला आहे. होळी सणाच्या पूर्वसंध्येला ज्या अंड्याचे ठोक भाव ४ रुपयापर्यंत जायचे त्या अंड्याला आज केवळ अडीच ते तीन रुपये दर मिळत आहे. कोंबड्यांना लागणाऱ्या खाद्याच्या तुलनेत हा भाव खूपच कमी आहे. त्यामुळे, दरवर्षी अंडे व्यवसायिकांना ५ हजारांचा तोटा सहन करावा लागत आहे.
पाड्याव्याला नुकसान होण्याची शक्यता; आर्थिक मदतीची मागणी
आता दोन, तीन दिवसानंतर होळी हा सण येणार आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात चिकनची विक्री होते. पण, बाजारात मागणीच नसल्याने आता व्यावसायिकांवर १० रुपये किलो जिवंत कोंबडी, अशी पाटी लावून विकण्याची वेळ आली आहे. शासनाने आम्हाला कोंबडी मागे काही आर्थिक मदत करावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा- महिला दिन विशेष : संसाराचा गाडा हाकण्यासाठी 'तिने' हातात घेतले रिक्षाचे 'स्टेअरिंग'