अमरावती - अमरावतीच्या येवदामध्ये १६० वर्षापासूनची रामलाडू महाप्रसादाची परंपरा कायम आहे. जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील कळमकर परिवाराने गेल्या ४ पिढ्यांपासून राम जन्मोत्सवनिमित्त रामलाडूच्या महाप्रसादाचा कार्यक्रम अविरतपणे सुरू ठेवला आहे.
कारंजा लाड येथील नामदेव महाराज राम जन्मोत्सवानिमित्त येवदा येथील शिवरामजी संपतराव कळमकर यांच्या घरी आले होते. त्यांनी घरोघरी जाऊन ५ कडधान्य जमा केले. त्याचे लाडू बनवून सर्वांना महाप्रसाद वाटला. तेव्हापासून त्यांच्या घराची कायापालट झाली. त्यानंतर संपतराव शिवरामजी कळमकर यांची तिसरी पिढी रामदास संपतराव कळमकर चौथ्या पिढीत सुनील रामदास कळमकर, नाना रामदास कळमकर आणि विलास रामदास कळमकर हे रामलाडूच्या महाप्रसादाची परंपरा कायम ठेवत आहेत.
हा महाप्रसाद तयार करण्यासाठी नामदेव महाराजांचे भक्त परिसरातील मुर्तीजापूर, जांभा, कारंजा, लाड या गावातून एकत्र येतात. ते कोणतेही पैसे न घेता स्वतः महाप्रसाद तयार करतात. महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिका आवर्जून उपस्थित राहतात.